सोलापुरातील प्रति दादा कोंडके चालत निघाले मुंबईला, शिवसेना अखंडित राहण्यासाठी सोलापूर ते मुंबई पदयात्रा
Solapur News : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्रित आले पाहिजेत. अशी प्रार्थना करण्यासाठी उत्तम शिंदे हे मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. त्यांना प्रति दादा कोंडके म्हणून ओळखलं जातं.
Solapur News : राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. हीच शिवसेना (Shiv Sena) अखंड राहावी यासाठी सोलापुरातील (Solapur) एक शिवसैनिक (Shiv Sainik) पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाला आहे. मुंबईत शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्याचा संकल्प असल्याची प्रतिक्रिया या शिवसैनिकाने दिली.
उत्तम शिंदे असे या शिवसैनिकाचे नाव आहे. सोलापुरातील उळे येथे राहणारे उत्तम शिंदे हे लहानपणापासून शिवसैनिक आहेत. त्यांना प्रति दादा कोंडके म्हणून ओळखलं जातं. शिवसेनेच्या अनेक प्रचार सभामध्ये देखील उत्तम शिंदे दादा कोंडके यांच्या वेशात अनेक वेळा सहभागी झाले आहेत.
अनेक वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं ती शिवसेना दुभंगलेली पाहून मनाला वेदना होतात. सर्वसामान्य शिवसैनिकाची देखील हीच भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे परत एकत्रित आले पाहिजेत. अशी प्रार्थना करण्यासाठी उत्तम शिंदे हे मुंबईच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. मुंबईत शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करुन शिवसेनेला लागलेले हे ग्रहण दूर व्हावे असे साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया उत्तम शिंदे यांनी दिली.
दरम्यान आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्त्व घेऊन पुढे जात आहोत असं एकनाथ शिंदे यांनी सातत्याने सांगितलं आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं अशी प्रति दादा कोंडके म्हणून ओळखले जाणाऱ्या उत्तम शिंदे यांची इच्छा आहे.
सत्तानाट्याला एक महिना पूर्ण
राज्यातील सत्तानाट्याला आज एक महिना झाला. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि त्यांना पक्षातील 40 आमदारांचा पाठिंबा मिळाला. यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्रीपदासह विधानसभा परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळलं आहे आणि राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. यानंतर 30 जून रोजी भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.