Pandharpur Rain : पंढरपूरमध्ये मेघगर्जनेसह पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी, नागरिकांची तारांबळ
Pandharpur Rain : पंढरपूर शहर व तालुक्याला मेघगर्जनेसह दमदार पावसाने चांगलेच झोडपले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडल्याचे दिसून आले.
Pandharpur News : पंढरपूर शहर व तालुक्याला काल (दि. 06) रात्री मेघगर्जनेसह दमदार पावसाने (Rain) चांगलेच झोडपले. सायंकाळी सातच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने परिसराला जोरदार झोडपून काढल्याने ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर राज्यात उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. पावसामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत आहे. पंढरपूरमध्ये (Pandharpur Rain Update) गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या पंढरपूरकरांना संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे आल्हाददायक दिलासा मिळाला.
पावसामुळे बळीराजा सुखावला
तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. पावसामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. रस्त्यावर पाणी साठल्याने उपनगरांमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते. यामुळे आपले कामकाज आटोपून घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. मात्र मान्सूनच्या आगमनानंतर झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरीराजा सुखावला आहे. तर नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील नरखेड परिसरातदेखील विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्याठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागलं होतं. दुष्काळसदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला मिळाला दिलासा. रोहिणी नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगली सुरुवात झाली आहे.उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि करमाळ्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांत तीन-चार मंडळ वगळता इतर मंडळात पाऊस पडला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी 102.5 मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 30.7 मि.मी. पाऊस पडला असून जवळपास ३० टक्के इतका पाऊस 5 जूनपर्यंत पडला आहे.
राज्यातील 'या' भागात येलो अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूर, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या