(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023: 'आता तरी व्हीआयपी दर्शन बंद करा', वृद्ध भाविकाचा रांगेत मृत्यू झाल्यानंतर लोकांचे आर्जव
Ashadhi Wari 2023: दर्शन रांगत तासनतास उभं असताना एका वृद्ध भाविकाचा जीव गेला. त्यामुळे नागरिकांना आता संताप व्यक्त होत असून व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.
Ashadhi Wari 2023: विठुरायाच्या पंढरीत सध्या भाविकांची रेलचेल सुरु आहे. पालख्यांचं प्रस्थान झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढीचा (Ashadhi Wari) सोहळा येऊन ठेपला आहे. या संपूर्ण पवित्र वातावरणात विठुरायांच्या भक्तांमध्ये मात्र काही प्रमाणात नाराजी असल्याचं पाहायाला मिळत आहे. सध्या भाविकांकडून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात यावे या मागणीने जोर धरला आहे. दर्शन रांगेत तासनतास उभं असताना एका वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्यानं भाविकांकडून ही संतप्त प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्यात यावे अशी मागणी सध्या भाविक करत आहेत.
आषाढी एकादशीसाठी लाखो भाविक विविध पालखी सोहळ्यामधून पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. त्यामुळे दर्शन रांगेत देखील हजारो भाविक तासनतास ताटकळत उभे असतात. यातच दोन दिवसांपूर्वी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध भाविकाचा रांगेतच दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यानंतर देखील रोज शेकडोच्या संख्येने व्हीआयपी र्शन देणे सुरूच आहे. त्यामुळे आता पंढरपुरातील दर्शन व्यवस्थेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
खरंतर वृद्ध आणि अपंग भाविकांना दर्शनासाठी वेगळी व्यवस्था करण्याची घोषणा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली होती. पण अशा पद्धतीची कोणतीच व्यवस्था नसल्याने आजही शेकडोच्या संख्येने वृद्ध भाविक रांगेत ताटकळत उभे राहत असल्याचं पंढपुरात अजूनही पाहायला मिळत आहे. तसेच विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटरपर्यंत असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबत जातो. याचा फटका वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांना बसत असतो.
दोन दिवसांपूर्वी घनश्याम भोसले या मराठवाड्यातील एका वृद्ध भाविकाचा दर्शन रांगेतील उड्डाण पुलावर मृत्यू झाला. 'जर वृद्धांना तुम्ही असच तासनतास रांगेत उभे राहायला लावणार असाल, तर किमान रोज शेकडोच्या संख्येने व्हीआयपी दर्शन घेणाऱ्या मंडळींना सोहळा संपल्यानंतर निवांत दर्शन द्या. पण रांगेतील भाविकांचे हाल करू नका' अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या भाविक देत आहेत. पालकमंत्र्यांनी फक्त एकादशीच्या दिवशीच व्हीआयपी दर्शन बंद केल्याने त्याआधीच अनेक जण व्हीआयपी दर्शन घेत आहेत. त्यामुळे जर हे व्हीआयपी दर्शन बंद केले तर रांगेतील भाविकांना आनंदाने आणि कमी वेळात दर्शन घेणे शक्य होणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे आता यावर मंदिर प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.