Pandharpur: विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून पुन्हा गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने अथवा वस्तू गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा
Pandharpur Vitthal Temple Audit : मंदिर समितीकडे असलेले सर्व प्रकारचे दाग दागिने पूर्णपणे सुरक्षित आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही असा खुलासा मंदिर व्यवस्थापनाने केला आहे.
![Pandharpur: विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून पुन्हा गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने अथवा वस्तू गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा Pandharpur Vitthal temple audit issue administration reveals no jewels of God are missing maharashtra marathi news Pandharpur: विठ्ठल मंदिर लेखा परीक्षणावरून पुन्हा गोंधळ, देवाचे कोणतेही दागिने अथवा वस्तू गहाळ नसल्याचा प्रशासनाचा खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/bb06e388e85f98f08b8265116fd659e61701493967261322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pandharpur Vitthal Temple Audit : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सन 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालावरून पुन्हा एकदा गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. मंदिरातील काही मौल्यवान वस्तूंचा तपशील सापडत नसल्याचा शेरा लेखा परिक्षकांनी दिल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने याबाबत खुलासा केला आहे.
यापूर्वी मंदिराच्या लेखा परीक्षण अहवालात लाडू प्रसादाबाबत देखील ताशेरे ओढले होते. आता यातच मंदिराचे पुरातन वस्तूबाबत लेखा परीक्षणात उल्लेख करण्यात आला होता. यात नित्योपचार विभागातील 15 ठिकाणच्या विविध चांदीच्या वस्तूंची ताळेबंधाला आणि रजिस्टरला नोंद घेतली नसल्याचे दाखविले होते. यात सभा मंडप समोरील चांदीचा दरवाजा, गरुड खांब, चांदीचा मोठा दरवाजा, देवाच्या शेजघराचा दरवाजा यासह 15 ठिकाणच्या चांदीच्या नोंदी नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हे सर्व दारांवरील चांदी ही 18 व्या शतकात अर्पण केलेली असून याबाबत शासनाने तज्ज्ञांकडून त्याची किंमत ठरवून देण्याची मागणी समितीने केली आहे.
अनेक वस्तू मूल्यांकनासाठी उपलब्ध नसल्याचा अहवाल
याशिवाय पानपुडा, पिकदाणी, पंखा हे मूल्यांकनात तपासनीस उपलब्ध झाला नसल्याचा शेरा आहे. कुकची वाटी, कवाळ, सोन्याची नाथ, मासोळी, मोठी चांदीची पार्ट्याही वस्तू मूल्यांकन अहवालात उपलब्ध झालेल्या नाहीत असा शेरा होता. देवाच्या स्वयंपाक ओवरीमधील धुपारातील वापरात येणार चांदीचा सोठ्या तपासनीस उपलब्ध झाला नसल्याचा शेरा होता. अशा पद्धतीने अनेक बाबींवर लेखा परीक्षणात शेरे आल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली.
पंढरपूर मंदिरे अधिनियम, 1973 मधील तरतुदीनुसार श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचा सन 2021 ते 2022 या आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण करण्यासाठी शासनाने मे. बीएसजी ॲन्ड असोसिएटस, पुणे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी सदर आर्थिक वर्षाचे लेखा परिक्षण करून या कार्यालयास अहवाल सादर केला आहे. यावरील आक्षेपाबाबत मंदिर प्रशासनाकडून खुलासा देण्यात आला आहे.
मंदिर समितीकडून खुलासा
सदर अहवालामध्ये श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरात विविध ठिकाणी खांबाला आणि दरवाज्याला लावण्यात आलेल्या चांदीची तसेच श्रींच्या मौल्यवान दाग दागिन्यांची नोंद शासनाच्या विधि व न्याय विभागाकडून अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून, त्यांच्याकडून मूल्यांकन करून घेवून, त्यांच्या अहवालानुसार ताळेबंदला व रजिस्टरला नोंद घेण्याची दक्षता घ्यावी अशी मार्गदर्शक सूचना केलेली आहे.
मौल्यवान दागदागिन्यांचे मुल्य, अमुल्य असून सदरचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन आणि दुर्मिळ आहे. याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे, मुल्यांकन केल्यानंतरच त्यांची नोंद ताळेबंदला घेता येते. सदर लेखा परिक्षकाने सूचना करणेपूर्वी म्हणजेच मंदिर समितीने 28 ऑगस्ट रोजी शासनास पत्र व्यवहार करून अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणेकामी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाने मूल्यांकनकार नियुक्त केल्यानंतर, त्यांच्या अहवालानुसार सदर दागदागिन्याची नोंद ताळेबंदला घेण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली आहे.
श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरकडे असलेले सर्व प्रकारचे दाग दागिने पूर्णपणे सुरक्षित आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही वा तशी नोंद लेखा परिक्षण अहवालामध्ये नाही. लेखा परीक्षकाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली आहे. या खुलाशावरून मंदिराचे सर्व दागिने सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला असून लेख परीक्षण अहवालातील त्रुटी दूर करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)