पंढरी ते डेन्मार्क... संगीतकार मारिया बडस्ट्यूला मायेची सावली; पंढरीतील नवरंगे बालकाश्रमातच पडलं पहिलं पाऊल
तिची मातृसंस्था म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी पंढरपुरात स्थापन झालेले वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रम आहे. मुंबई येथील प्रार्थना समाज यांनी 1875 मध्ये या संस्थेची पंढरपूर येथे स्थापना केली होती

सोलापूर : सध्या देशात एक महिला संगीतकाराची चर्चा जोरात सुरू आहे, याचं कारणही तसंच आहे. आज जरी ती डेन्मार्कची नागरिक म्हणून पुढे येत असली तरी तिचे मूळ पंढरपूरची (Pandharpur) जोडले गेलेले आहे. मारिया बडस्ट्यू ही डेन्मार्कची संगीतकार ही भारतात विविध ठिकाणी आपल्या संगीताच्या जादूने चर्चेत आली आहे. पाच ते सहा महिन्याची असताना पंढरपूर येथील नवरंगे बालकाश्रम येथून डेनमारच्या या कुटुंबाने तिला दत्तक घेतले आणि ती डेन्मार्क ला गेली. पुढे ती याच बडस्ट्यू कुटुंबासोबत मोठी झाली आणि संगीत (Music) क्षेत्रात आपली करियर घडविले. शेवटी मातीची ओढ ही शांत बसू देत नाही हेच खरे कारण भारतात आपले कार्यक्रम सादर करायला आलेली मारिया थेट आपल्या मातृसंस्थेचा पत्ता शोधत पंढरपुरातही पोचली होती.
तिची मातृसंस्था म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी पंढरपुरात स्थापन झालेले वासुदेव बाबाजी नवरंगे बालकाश्रम आहे. मुंबई येथील प्रार्थना समाज यांनी 1875 मध्ये या संस्थेची पंढरपूर येथे स्थापना केली होती. पंढरपूर परिसरात असणारी अनाथ बेवारस चिमूरड्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे ती माया मिळावी हीच त्या मागची कल्पना होती. आता मारियासारख्या शेकडो मुलांचे आयुष्य या संस्थेने घडविले आहे.
याबाबत बोलताना संस्थेच्या अधीक्षक जयश्री गाडे यांनी संस्थेबद्दल भरभरून सांगितले. मारियासारख्या कित्येक मुली आणि मुले यांनी आपले करिअर घडविले आहे. अनेकजण डॉक्टर आहेत, काही मोठे अधिकारी आहेत, तर काही परदेशात विविध व्यवसायात स्थिरावल्याचे गाडे सांगतात. आजही परदेशातील आणि देशातील दत्तक दिलेली मुले मुली आठवणीने आपल्या या मातृसंस्थेत भेट देण्यासाठी येत असतात. मारिया ही नुकतीच या संस्थेत येऊन भेटून गेल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे समाजात जागृती वाढल्याने आणि कायदे कठोर झाल्याने अशा अनाथ मुलांची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. याच पद्धतीने आमच्यासारख्या संस्थेतील मुलांना दत्तक घेण्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात असून केंद्राच्या स्थापन झालेल्या समितीमार्फत अशी मुले कायदेशीर पद्धतीने दत्तक दिली जातात असे त्यांनी सांगितले. जयश्री गाडे या 2015 पासून या संस्थेचे कामकाज बघत असून त्यांच्या काळात जवळपास 14 ते 15 मुली परदेशात तर 80 ते 85 मुली देशात कायदेशीर पद्धतीने दत्तक दिल्याचे सांगतात.
मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने झाले दत्तक विधान
याच संस्थेत गेले 35 वर्ष सेवा करणारे धर्मराज डफळे यांच्या काळातच मारियाला डेन्मार्क येथे दत्तक देण्यात आले होते. आज त्यांना मारिया नीटशी आठवत नसली तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यावेळी तिचे दत्तक विधान झाल्याचे डफळे सांगतात. आजही अनेक देशातील आणि परदेशातील मुले आपल्याशी संपर्क करतात एवढेच नाही तर नाताळ सारख्या सुट्टीत परदेशी असणाऱ्या मुली या मातृसंस्थेला भेट देऊन जात असल्याचेही डफळे सांगतात. मारियासारख्या अनेक मुली फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका अशा देशातून आपल्या मातृसंस्थेच्या ओढीमुळे पंढरपुरात येऊन भेटत असल्याचेही डफळे यांनी सांगितले. आपण एक सेवा म्हणून हे काम स्वीकारले आणि यामुळेच आपल्या कुटुंबाचे चांगले झाले अशी डफळे यांची भूमिका आहे. समाजात अशा पद्धतीच्या प्रामाणिक सेवा देणाऱ्या संस्था असल्यानेच मारिया सारख्या शेकडो अनाथ आणि समाजाने टाकून दिलेल्या मुलामुलींना मायेची सावली मिळते आणि यातूनच हक्काचे घरही मिळते .. यातूनच मारिया सारख्या मुली आपले करिअर घडवितात आणि पुन्हा माय भूमीच्या ओढीने धावत आपल्या मातीकडे येतात.
हेही वाचा
मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण'नीती'; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार























