Pandharpur News: मराठा आरक्षणासाठी वारकरी आता विठुरायाच्या चरणी, जरांगे यांच्या गावातील महिलांनी देवाला घातले साकडे
मराठवाडा , खानदेश या भागातील विठ्ठल भक्त अडचणींची दिव्य पार करत मराठा आरक्षणासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहेत.
पंढरपूर: राज्यभरात सध्या मराठा आंदोलन (Maratha Reservation Protest) सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वारकरी शिक्षण संस्थेचे जोगदंड महाराज आपल्या 200 विद्यार्थ्यांसह भजन आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या संस्थेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जर आरक्षण मिळालं तर या आरक्षणाचा फायदा या विद्यार्थ्यांना होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याकडे शिक्षण घेणारे हे गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांनी ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत मंदिर परिसर (Vitthal Rukmini Temple) दुमदुमून सोडला.
मराठा आरक्षणासाठी शासनाकडून अद्याप ठोस निर्णय होत नसताना जरांगे यांची प्रकृती देखील खालावू लागल्याने मराठवाडा परिसरातील भाविकांना आता फक्त विठुरायाच्या आसरा वाटू लागला आहे . त्यामुळे परिस्थिती चिघळत असतानाही बीड , जालना भागातील वारकऱ्यांनी देवाच्या चरणी साकडे घालण्यासाठी अनेक अडचणी पार करीत मंदिर गाठले आहे . सध्या मराठा आरक्षणामुळे अनेक ठिकाणची एस्टी बसेस सेवा बंद आहे . त्यातच ठिकठिकाणी रास्ता रोको सुरू असल्याने प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे . यामुळे विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या खूप कमी झाली असून केवळ 10 ते 15 मिनिटात देवाचे दर्शन होत आहे .
यातूनही मराठवाडा , खानदेश या भागातील विठ्ठल भक्त अडचणींची दिव्य पार करत मराठा आरक्षणासाठी देवाला साकडे घालण्यात येत आहेत. आता राज्यकर्त्यांवर विश्वास उरला नसल्याने विठुराया तूच आरक्षण मिळवून दे असे साकडे बीड , जालना भागातून आलेले भाविक देवाला घालत आहेत. जरांगे यांची प्रकृती नीट राहून मराठा आरक्षण मिळावे यामागणीसाठी त्यांच्या गावातील महिलाही विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी आल्या आहेत .
पंढरपूर वेळापूर रोडवर एस्टी बस पेटवली
पंढरपूर वेळापूर रोडवर भंडी शेगाव येथे पिंपरी चिंचवडरून येणारी एस्टी बस पेटवली. बसमधील प्रवाशांना खाली उतरवून आग लावली. एस्टी बस जाळून खाक झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडवरून बस पंढरपूरला येत होती. थोड्या वेळापूर्वी अज्ञात आंदोलकांनी गाडीतील 8 ते 10 प्रवाशांना खाली उतरवले आणि पेट्रोल टाकून बसला आग लावली होती.
राज्यभरात गावबंदीचा निर्णय
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून आता वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिले जाणार नसल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच, गावात राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधी आल्यास त्यांना विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता ग्रामीण भागात देखील तापतांना दिसत आहे.