Malshiras Assembly constituency: मोहिते पाटीलांच्या माळशिरस विधानसभेचं ठरलं! पुन्हा सातपुते विरूध्द उत्तम जानकर, फडणवीस, शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला
Malshiras Assembly constituency: मोहिते पाटील यांच्या माळशिरस विधानसभेचे ठरले आहेत. यावेळी पुन्हा आमदार राम सातपुते आणि उत्तम जानकर भिडणार आहेत. यामुळे आता फडणवीस आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या मोहिते पाटील यांच्या माळशिरस या राखीव विधानसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकदा विद्यमान आमदार राम सातपुते आणि शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते उत्तम जानकर यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या वेळेला आमदार राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांच्यावर मात करीत माळशिरस चा गड मिळवला होता . मात्र त्यावेळी मोहिते पाटील कुटुंब हे भाजपमध्ये होते आणि मोहिते पाटलांच्या मदतीने भाजपला माळशिरस विधानसभा जिंकता आली होती. आता यावेळी परिस्थितीत मोठा बदल झाला असून मोहिते पाटील यांनी लोकसभेला भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने आता उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची मोठी ताकद मिळणार आहे.
वास्तविक उत्तम जानकर हे जसे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात तसेच चळवळीतील सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याला ओळख आहे. लोकसभा निवडणूक काळात अजित पवार गटात असतानाही पक्ष न सोडता अजित पवारांवर थेट बारामतीमध्ये जाऊन सर्वात टोकाची टीका केली होती. हिम्मत असेल तर अजितदादाने मला पक्षात काढून दाखवावेत मी त्यांना काढून टाकेन असे उघडपणे आव्हान देणारे उत्तम जानकर हे महाराष्ट्राला दिसले होते. महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे अद्याप जागावाटप झाले नसले तरी माळशिरसची जागा शरद पवार गटाकडे असून येथील उमेदवारही उत्तम जानकर हेच असणार आहेत.
जानकर हे धनगर समाजाचे असले तरी त्यांनी खाटीक धनगर प्रमाणपत्र मिळावीत अनुसूचित जातींमधून गेल्यावेळी विधानसभा लढली होती. माळशिरस तालुक्यात धनगर समाजाचे निर्णायक मतदान असले तरी पारंपरिक हे मतदान नेहमीच भाजपच्या मागे राहत आले आहे. यातच उत्तम जानकर यांनी मागास जातीत घुसखोरी केल्याचा आक्षेप मागासवर्गीय नेते करू लागल्याने जानकर याना हि नाराजी भोवणार आहे. माळशिरस मतदारसंघात जवळपास १५ टक्के अनुसूचित जातीचे मतदान असून यांची समजूत काढणे हा जानकर यांच्या समोरील आव्हान असणार आहे. याशिवाय गेली ३५ वर्षे मोहिते पाटील यांच्याशी सुरु असलेला टोकाचा संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपला आणि मोहिते व उत्तम जानकर यांचे मनोमिलन झाले आहे. मात्र, गावोगावी वर्षानुवर्षे मोहिते पाटील याना विरोध करणारा गट व जानकर याना विरोध करणारा मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे अद्याप मनोमिलन झाल्याचे दिसत नाही.
आता मोहिते पाटील आणि जानकर याना एकत्रित येत मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा लागणार आहे . याशिवाय तालुक्यातील निर्णायक धनगर समाज आपल्याकडे वळवणे हि जानकर यांच्या पुढील आव्हान आहे. महायुतीतील जागा वाटपात सध्या माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते असल्याने ही जागा भाजपला मिळणार असून भाजपने सध्याच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीत उतरवण्याची तयारी केल्याने माळशिरस ची उमेदवारी राम सातपुते यांना नक्की झालेली आहे. आमदार सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी मोठी कामे केली असून जनतेत असलेला थेट संपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.
गेल्या पाच वर्षात राम सातपुते यांनी स्वतःचा मोठा गट तयार केल्यानेच तालुक्याच्या पश्चिम भागात सातपुते याना मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वसामान्य मतदारांना थेट संपर्क साधता येणारे सातपुते यामुळे माळशिरस तालुक्यात लोकप्रिय बनले होते . सोलापूर लोकसभा उमेदवारी घेण्यासही येथील मतदारांचा विरोध होता . गेल्या ५० वर्षात तालुक्याच्या दुष्काळी भागाला कधीही पाणी न मिळाल्याने हे नाराज मतदारांना सातपुते यांच्या रूपाने आशेचा किरण दिसला होता . सातपुते यांनीही सत्तेचे फायदा घेत या भागाला पाणी देणाऱ्या योजना आणून शब्द खरा केला आहे . याशिवाय रेल्वे , रस्ते अशी अनेक कामे सातपुते यांनी मार्गी लावताना त्यांनी आरोग्यासाठी केलेले काम जास्त प्रसिद्धी आहे . लोकसभा निवडणुकीत बीडचे पार्सल परत पाठवा अशी टीका करणाऱ्या मोहिते पाटील याना पुन्हा एकदा दणका देत भाजपने राम सातपुते यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे . या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात लाट असतानाही मोहिते व जानकर या दोघांना एकत्र येऊन मोठी आघाडी घेता आली नव्हती.
माळशिरस निवडणुकीत यंदा पाण्याच्या प्रश्नांसोबत बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्वाचे मुद्दे ठरणार असले तरी जानकर व मोहिते पाटील यांच्या एकत्रित बलाढ्य ताकतीसमोर भाजप राम सातपुते याना कसे निवडून आणणार हा मोठा प्रश्न असणार आहे . या निवडणुकीत गावोगावी असणारे जानकर विरोधी मोहिते पाटील गटाचे मतदार आणि धनगर समाजाच्या जीवावर सातपुते विजयापर्यंत पोचणार का हेच दिसणार आहे . सध्या भाजप मध्ये असणारे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिकाही यावेळी महत्वाची ठरणार असून त्यांच्याकडून ऐनवेळी काय निरोप मिळतात यावरही सातपुते यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे . सध्यातरी हि लढाई सातपुते विरुद्ध जानकर अशी नसून ती फडणवीस विरुद्ध शरद पवार अशीच राहणार आहे . त्यामुळे जरांगे व हाके फॅक्टर सोबत पवारांचे डावपेच सरस ठरतात कि फडणवीस यांची रणनीती यावर माळशिरसाचे भवितव्य अवलंबून आहे .