Sushilkumar Shinde: पक्षातील लोकांनीच कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवले; सुशीलकुमार शिंदे यांचा निशाणा
Sushilkumar Shinde: पक्षातील लोकांनीच कटकारस्थाने करून मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले. तेव्हापासून त्यांचा पराभव सुरूच असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले.
Maharashtra Politics Congress: पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी म्हटले. सोलापुरात (Solapur) महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, मला कटकारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून काढण्यात आले. त्यानंतर मला राज्यपाल करून आंध्र प्रदेशमध्ये पाठवण्यात आले. राज्यपाल पदावरून मी पुन्हा दिल्लीत केंद्रीय मंत्री म्हणून गेलो. मात्र, कटकारस्थान करणाऱ्या नेत्यांना 'जो' पराभव स्वीकारावा लागला तो अजूनपर्यंत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिले पाहिजे असे मला वाटते असेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांनी निशाणा साधलेले नेते कोण याची चर्चा आता रंगू लागली आहे.
चांगलं काम लोक विसरतात
सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केले. गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावईही गुजराती असल्यामुळे मला ते करावे लागले अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.
काँग्रेसचे निष्ठावंत नेते
सुशीलकुमार शिंदे हे 16 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृ्त्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या ऐवजी विलासराव देशमुख यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले. सुशीलकुमार शिंदे 2004 ते 2006 या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्रीदेखील झाले. त्यांनी साडे सहा वर्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या लोकसभा नेतेपदीदेखील होते. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. गांधी कुटुंबीयांच्या जवळील नेते समजले जातात.
इतर महत्त्वाच्या बातम्या: