Sadabhau Khot : राष्ट्रवादी पक्ष नाही तर अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी, सदाभाऊ खोतांची खोचक टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) हा पक्ष नाही तर अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली
Sadabhau Khot : राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) हा पक्ष नाही तर अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. सोलापुरातील (Solapur) कासेगाव इथं शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी चौफेर फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. सहकारी कारखाना बंद पडला की लगेचच घेतात. बंद पण हेच पाडतात आणि खासगी करुन हेच चालवतात असे खोत म्हणाले.
शरद पवार यांच्या ताब्यात जवळपास 50 कारखाने आहेत. सहकारीमध्ये खासगीकरण केल्याचे खोत म्हणाले. महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा शरद पवारांचा उल्लेख हा शकुनी मामा असा केला जाईल असेही खोत म्हणाले. सध्याच्या महाभारतातले शरद पवार हे शकुनी मामा असल्याचे खोत म्हणाले. 25 किलोमीटर परिसरात एका पेक्षा जास्त कारखाने असतील तर कारकानदार ऊसाच्या कांडीवरुन भाव देतील.पण हे कारखानदार अतिशय हुशार आहेत. प्रत्येक पक्षात यांची लोकं आहेत. सत्ता कोणाची पण येऊ दे हे गडी आहेतच. या सर्वांचा ब्रेन कोण आहे? तर बारामतीकर असेही खोत म्हणाले. शरद पवार हे क्रिकेटचे अध्यक्ष बेकायदेशीर होते. क्रिकेटचा अध्यक्ष कोणी असावं. ज्याला बॅटिंग करायला येते, बॉलिंग करायला येते, फील्डिंग करायला, येते पण शरद पवार यांना काहीच येत नाही. शरद पवारसाहेब कुस्ती संघाचे अध्यक्ष होते.. त्यांनी कधी कुस्त्या गाजवल्या नाहीत. हिंदकेसरी कधी मिळवला आहे का हे कधी मी ऐकलं नसल्याचे खोत म्हणाले. जिथे पैसा तिथे पवार घराणे आहे. पैसा यायला लागला की ते कशाचेही अध्यक्ष होतात असे खोत म्हणाले.
ऊसाला तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखानदाराला मतदान करु नका
जो कारखाना ऊसाला तीन हजार रुपयापेक्षा कमी भाव देईल त्या कारखान्याचा चेअरमन ज्या पक्षातून निवडणुकीत उभा राबील त्याला मतदान करायच नाही असेही खोत म्हणाले. दोन साखर कारखान्यामधील 25 किलोमीटरची असलेली अट काढून टाकायला हवी. मात्र, सर्व साखर कारखानदारांनी याला विरोध केला असल्याचे खोत म्हणाले. 25 किलोमीटरच्या आतमध्ये दुसरा साखर कारखाना काढता येणार नाही असा कायदा करुन घेतला आहे. 25 किलोमीटरच्या आतील परिसरातील सर्व गावांना, लोकांना मीच लुटणार दुसऱ्यांनी यायचं नाही असं हे असल्याचे खोत म्हणाले. जर असं असेल तर 25 किलोमीटरच्या आतमध्ये बियर बार, देशी दारुचे दुकान, किराणा दुकान, पिठाची गिरणी, रेशन दुकान सगळे काही एकच पाहिजे. गावात एकच पिठाची चक्की असेल तर तो कसा वागेल? उधार देणार नाही, बारीक दळणार नाही असेही खोत म्हणाले.
गावगाड्यातील शेतकरी हाच माझा पक्ष
शेतकरी स्वप्न घेऊन जगत आहे. पूर्वीच्या काळात संपूर्ण अर्थशास्त्र शेतीभोवती होतं. पूर्वीच्या काळात शेतीचा भार 75 टक्के होता आता तो 40 टक्के इतका झाल्याचे खोत म्हणाले. एक क्वार्टरचा भाव 180 रुपये इतका असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला 30 मिळणार असतील तर कसं चालेल असेही ते म्हणाले. तुम्हाला मत कोणाला द्यायचा ते द्या, तुमची हौस फिटलेली नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक व्हा असं आवाहनहीखोत यांनी केलं. मी आमदार झालो, मंत्री झालो पण पदासाठी कोणत्याही पक्षात गेलो नाही. माझा एकच पक्ष आहे तो म्हणजे गावगाड्यातील शेतकरी असे खोत म्हणाले.
कोणतेही सरकार येऊ जाऊ द्या, मात्र लढणं आमच्या पाचवीला पुजलेलं आहे. कारण शेतकरी संघटनेने अनेक सरकारं बघितली आहेत. त्यातल्या त्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बरे आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. देवेंद्र फडणवीस हे जोपर्यंत प्रस्थापितांची बाजू घेत नाहीत. त्या माणसाकडे साखर कारखाना, दूध संघ, बॅंका असे काही नाही. आमची एकच अपेक्षा आहे. गड्या तुझं काही नाही, फक्त आता या प्रस्थापितांना सुरुंग लाव असे खोत म्हणाले. यांना सुरंग लावला की, फडणवीस हा माणूस 80 वर्ष राज्य करेल. मात्र हे गडी उध्वस्त केले पाहिजेत, असी टीका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाव न घेता केली.
महत्त्वाच्या बातम्या: