(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात, वाटचाल जवळपास संपुष्टात: प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्रात जरांगे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे स्ट्राँग मराठा नेता म्हणून पुढे आले आहेत बाकी सगळे झोपलेत असे सांगत याचा फटका अजित पवार आणि भाजपाला बसल्याचा दावा केला .
सोलापूर: महाराष्ट्राच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha) वंचितांची मोठी ताकत असून प्रत्येक मतदारसंघात आमचे दोन ते अडीच लाख मतदार आहे . आता उद्या होणाऱ्या राज्यातील लोकसभा जागा वाटप बैठकीला आमच्या पक्षांचे प्रतिनिधी जाऊन इतर पक्षांची भूमिका ऐकून घेतील आणि मगच जागावाटपाबाबत दावा केला जाईल असे मोठे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले आहे. काल रात्री उशिरा माढा येथील ओबीसी (OBC) महासंघाचा कार्यक्रम संपल्यावर त्यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. तसेच इंडिया आघाडीचे भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आले असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आलीय, असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षावर सडकून टीका करताना काँग्रेसचा हेतू पक्ष वाढवणे आहे की केंद्रातले मोदी सरकार घालवणे हा हेतू आहे असा सवाल आपण जाहीरपणे केला होता. काँग्रेस जर एकटी मोदींना हाताळू शकली असती तर त्यांनी इतरांना बरोबर घेतले नसते. जर तुम्ही ताकतवान नाही आणि इतरांना बरोबर घेता त्यावेळी तुम्ही इज्जत द्यायला शिकले पाहिजे आणि इतरांना शेअर करायलाही शिकले पाहिजे असा टोला लगावला. महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे काँग्रेसने येथे इज्जत द्यायला आणि शेअर करायला शिकले पाहिजे. तुम्ही जागांची बाहेर कितीही अवास्तव मागण्या केल्या तरी बैठकीत बसल्यावर भान ठेवले पाहिजे असा सल्ला दिला. ज्यावेळी इंडिया आघाडीची स्थापना झाली त्यावेळी नितीशकुमार यांच्याकडेच तो पुढाकार ठेवायला पाहिजे होता . यात जो कुरघोड्या झाल्या आणि काँग्रेसने दुसरी यात्रा काढली यात इंडिया आघाडीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना घेतले गेले नाही ते मध्यप्रदेशाच्या पार्श्वभूमीवर फारच लागले असे मला वाटतंय असे आंबेडकर यांनी सांगितले .
इंडियात काँग्रेस आणि अखिलेश एवढेच शिल्लक : प्रकाश आंबेडकर
आपला फक्त वापराचं होणार असेल आणि आपल्याला इज्जतच मिळणार नसेल तर या आघाडीत राहावे कशाला अशी मानसिकता इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची झाल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. आता इंडियात काँग्रेस आणि अखिलेश एवढेच शिल्लक राहिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी विभक्त झाली आहे आता ती काय भूमिका घेते हे पाहावे लागेल असा टोला आंबेडकर यांनी शरद पवार याना लगावला.
युद्धात आणि प्रेमात सर्व माफ, प्रकाश आंबेडकरांचा टोला
जर मी पंतप्रधान मोदी आहे असा विचार केला तर मला तिसरी टर्म जिंकायची आहे तर मला जिथे जिथे बोटे घालता येतील जिथे जिथे चिरा पडल्या आहेत. तिथे भेगा पाडायचे काम मी करणारच असे सांगत इंडिया आघाडीच्या फुटीबाबत विश्लेषण केले. अशा पस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजप आणि आरएसएस काय करणार हे तुम्हाला लक्षात घेतलेच पाहिजे असे सांगत युद्धात आणि प्रेमात सर्व माफ असते असा टोला आंबेडकरांनी काँग्रेसला लगावला .
जरांगे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे स्ट्राँग मराठा नेता : प्रकाश आंबेडकर
मनोज जरंगे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना त्यांनी जे गरीब मराठ्यांसाठी आंदोलन उभे केले आहे ते योग्य आहे. असे सांगताना जर सरकारने गरीब मराठ्यांची अवस्था बघून जर शेतीला सपोर्ट केला असता तर आणि जर ते खाजगी क्षेत्रात आणले नसते तर कदाचित ही मागणी आली नसती असे सांगितले. आता शेतीतही काही नाही आणि नोकरीतही काही नाही त्यामुळे उपाशीपोटी असणारा माणूस जे मिळेल त्यासाठी धडपडणारी असे सांगत जरांगेच्या आंदोलनाचे समर्थन केले . जरांगे पाटील त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहणार कारण त्यांनी 20 लाख लोके मुंबईत उतरवून दाखवली असे सांगितले . त्यामुळेच आता महाराष्ट्रात जरांगे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे हे स्ट्राँग मराठा नेता म्हणून पुढे आले आहेत बाकी सगळे झोपलेत असे सांगत याचा फटका अजित पवार आणि भाजपाला बसल्याचा दावा केला .
हे ही वाचा :
Prakash Ambedkar : मराठा आरक्षण निर्णयानंतर आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर, इतर लीडरशीप बाद: प्रकाश आंबेडकर