BMC Election 2026: एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा पसरला; ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली?
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उमेदवार न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली आहे.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काल रात्रीच मनसे, ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपने आपल्या उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म देऊ केले आहेत. एबी फॉर्म मिळालेले उमेदवार आपल्या पुढच्या तयारीला लागले, मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते उमेदवार प्रचंड नाराज झाले. यामुळेच मुंबईत (BMC) अनेक ठिकाणी बंडखोरी होताना दिसली. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपमध्ये (BJP) बंडखोरी झाली. आमदार कालिदास कोळंबकर यांच्या बालेकिल्यात वॉर्ड क्रमांक 200 ची उमेदवारी भाजपने संदीप देशपांडे यांना दिली. मात्र, देशपांडे यांना तिकिट जाहीर झाल्यानंतर नाराज भाजपचे नाराज इच्छूक उमेदवार गजेंद्र धुमाळ आणि संजय दास्ताने या दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर्ड क्रमांक 200 मध्ये झालेल्या या बंडखोरीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. तसेच ही जागा भाजपला सुटल्याने नाराज झालेले शाखाप्रमुख आशिष कोदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ताच राहतो अशी पोस्ट सोशल मिडियावर शेअर करत आशिष कोदे यांनी नाराजी व्यक्त केली. या मत विभाजनामुळे वॉर्ड क्रमांक 200 मध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवाराला फायदा होण्याची शक्यता आहे. (Mumbai Election news)
तर दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्येही बंडखोरीची लागण झाली. याठिकाणी उद्धव ठाकरे गटाने माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिंदे गटातून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. प्रकाश पाटणकर हे काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर सपत्नीक गेले होते. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख, भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे , भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हा महामंत्री अक्षता तेंडूलकर आणि उबाठातून आलेले प्रकाश पाटणकर असे तिघेजण इच्छूक आहेत. यात प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडूलकर या दोघांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
याशिवाय, पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक 5 मध्येही भाजप आणि शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरु होती. तब्बल पाच तास या एका जागेवरून भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते नंदनवन बंगल्यावर चिंतन करत होते. वॉर्ड क्रमांक ५ ची जागा भाजपला आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधु प्रकाश दरेकर यांना हवी होती. मात्र वॉर्ड क्रमांक 5 च्या माजी नगरसेविका संजना घाडी या नुकत्याच उबाठाची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आल्या होत्या. पक्षात येतानाच त्यांना उमेदवारीची हमी देण्यात आली होती, मात्र भाजपच्या हट्टापुढे शिंदेंच्या शिवसेनेचे काहीही चाललं नाही. आता संजना घाडी यांना वॉर्ड क्रमांक 5 च्या बदल्यात वॉर्ड क्रमांक 4 ची जागा दिली जात आहे, मात्र, त्या या जागेसाठी तितक्याशा उत्साही नाहीत. कारण या वॉर्डमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे हे आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते. मुलासाठी जागा सुटत नसल्याने शिवसेना आमदर प्रकाश सुर्वे रात्री उशिरपर्यंत नंदनवन बंगल्यावर तळ ठोकून होते. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 4 मधून कोणाला उमेदवारी मिळणार, हे अद्याप कळू शकलेले नाही.
Mumbai Election 2026: मनसेच्या स्नेहल जाधव यांचा राजीनामा
दादर कबुतरखाना आणि परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मनसेच्या माजी नगरसेविका स्नेहल जाधव नाराज झाल्या होत्या. याच नाराजीतून त्यांनी मनसेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. तर गोरेगावमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गटाचे गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार समीर देसाई यांनी भाजपात पक्षप्रवेश केला. याठिकाणी भाजपकडून समीर देसाई यांच्या पत्नीला क्रमांक 56 मधून राजूल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, समीर देसाईंच्या येण्याने आजबाजूच्या तीन वॉर्डमध्ये भाजप-महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. बोरिवली पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 14च्या भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी सोमवारी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला. तर दिंडोशीतील प्रभाग क्रमांक 37 मध्ये शिंदे गटाच्या सिद्धी शेलार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
आणखी वाचा
मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश























