Hanuman Jayanti 2023: सोलापुरातील बेचिराख झालेल्या खरखटणे गावातील पूर्व-पश्चिम मुखी मारुती; मंदिराची ख्याती पंचक्रोशीत
Hanuman Jayanti 2023: खरकटणे गावात महाराष्ट्रातील पूर्व-पश्चिम मुखी असणारे एकमेव मारुतीचे मंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेल्या नागरिकांच्या पुढच्या पिढ्या आजही दर शनिवारी या मारुतीच्या दर्शनाला जातात.
Hanuman Jayanti 2023: मोहोळ तालुक्यातील (Mohol Taluka) खरखटणे हे गाव बेचिराख झालेले गाव म्हणून ओळखले जाते. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी निजामाने हल्ला केल्यानंतर तालुक्याच्या नकाशावरून खरकटणे हे गाव बेचिराख झाल्याची माहिती इथले मूळ रहिवाशी असलेले पण दुसरीकडे स्थायिक झालेले नागरिक देतात. हे गाव जरी बेचिराख झाले असले तरी खरकटणे गावात महाराष्ट्रातील पूर्व-पश्चिम मुखी असणारे एकमेव मारुतीचे मंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी गाव सोडून गेलेल्या नागरिकांच्या पुढच्या पिढ्या आजही दर शनिवारी या मारुतीच्या दर्शनाला जातात. नवसाला पावणारा मारुती म्हणून या मंदिराची ख्याती पंचक्रोशीमध्ये आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, इसवी सन सतराशेच्या काळात खरखटणे गावावर नानासाहेब पेशव्यांचे राज्य होते. तर लगतच असणाऱ्या भोयरे या गावावरती हैदराबादच्या निजाम संस्थानचा ताबा होता. खरकटणे या गावापासून भोवरे या गावापर्यंत त्या काळात मोठा भुयारी मार्ग तयार करण्यात आला होता. तो भुयारी मार्ग निजामशहाला माहीत नव्हता. त्या काळात या भुयारी मार्गाचा वापर लोक धनद्रव्य वाहून नेण्यासाठी करीत होते. मात्र गावातील एका महिलेने त्या भुयारी मार्गााची माहिती निजाम संस्थानच्या राजाला दिली. त्यानंतर निजामशहाने खरकटणे गावावर हल्ला केला. जाचाला कंटाळून त्या काळात खरकटणे गावातील लोक राज्यभरातील विविध गावात स्थलांतरित झाले. मूळचे जाधव असलेले ग्रामस्थ साठ गावात स्थलंतरीत झाल्याने आमचे आडनाव साठे झाले अशी माहिती या गावाचे पिढीजात पाटील असलेल्या विजय पाटील-साठे यांनी दिली.
निजामाने हल्ला केल्यानंतर ज्या महिलेने माहिती दिली होती, तिच्यावर देखील हल्ला करण्यात आला. ज्यात तिचा मृत्यू झाला. त्याच महिलेने श्राप दिल्याने गाव बेचिराख झाले, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर काही लोकांच्या मते प्लेग महामारीची साथ आल्यानंतर लोक गावं सोडून स्थलांतरीत झाले. मात्र मागील कित्येक वर्षात लोक गावात राहायला आलेले नाहीत. शेजारी असलेल्या मलिकपेठ गावात मूळचे खरकटणेचे असलेल्या अनेक ग्रामस्थांची घरे आहेत. मागील 20 वर्षात काही लोक इथे राहायला येत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात लोकमधील भीती कमी झाल्याची प्रतिक्रिया मालिकपेठ-खरकटणे या गावचे माजी सरपंच नागेश साठे यांनी दिली.
खरखटणे गावातील या मारुतीला नवसाला पावणारा मारुती म्हणून अनेकांना प्रचिती आली आहे. त्यामुळे गावात लोक जरी राहायला नसले तरी महाराष्ट्रभरात अनेक भक्त दर शनिवारी तसेच हनुमान जयंतीला खरखटणे गावात येतात. पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूने मुख असलेल्या हनुमानचे दर्शन घेतात. ''अनेक वर्षांपूर्वी आमचे आजोबा हे या गावातील पाटलाकडे कामाला होते. तेव्हा हा मारुती त्यांना प्रसन्न झाला. गावात परतल्यानंतर त्यांनी याच मारुतीचे मंदिर बांधले. पण दरवर्षी हनुमान जयंतीच्या आधी ते खरखटणेला येऊन मारुतीचे दर्शन घ्यायचे. मागील तीन पिढ्यापासून आम्ही दरवर्षी न चुकता खरखटणेला येतो.", अशी प्रतिक्रिया नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातून दर्शनासाठी आलेल्या वागसकर परिवारातील सदस्यांनी दिली.
खरखटणे गावातील या हनुमान मंदिराच्या मागेच एक समाधी आपल्याला दिसते. आख्यायिकेत सांगितलेल्या महिलेची ही समाधी असून तिला 'मांगीनमाता' म्हणून संबोधलं जात असल्याचे स्थानिकांनी सांगितलं. गावात प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी अनेक पुरातन शिळा दिसून येतात. ज्या भुयारी मार्गामुळे खरखटणे गावावर हल्ला झाला होता. ते भुयारी मार्ग जनावरे जाऊ लागल्याने काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आल्याची माहिती आहे. शेकडो वर्षांपूर्वी बेचिराख झाल्याचे सांगितले जाणाऱ्या या गावात आज लोक वास्तव्यास येऊ लागले आहेत. शेकडो एकर शेत जमिनी असलेल्या गावात केवळ 50-100 लोक वास्तव्यास आहेत हे मात्र विशेष.
(या बातमीतील माहिती ही स्थानिकांच्या श्रद्धा, आख्यायिकावर आधारित आहे. यातील कोणत्याही माहितीशी एबीपी माझा सहमत असलेच असे नाही. )