(Source: Poll of Polls)
महाराष्ट्रातील उरलेली एकमेव सर्कस आता मोजतेय शेवटच्या घटका, प्रेक्षकांविना ओस पडू लागले सर्कशीचे तंबू!
देशभरात बोटावर मोजण्याइतक्या सर्कस राहिल्या असून महाराष्ट्रात उरलेली एकमेव सर्कस देखील आता अंतिम घटका मोजत आहे.
सोलापूर : एकेकाळी आबालवृद्धांच्या हक्काच्या करमणुकीची सर्कस (Circus) आता काही दिवसांनी फक्त पुस्कात किंवा चित्रामध्ये पाहायची वेळ येणार आहे. मराठी माणसाने सुरु केलेली ही कला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. आता या करमणुकीच्या व्यवसायाकडे शासनाने लक्ष न दिल्यास ही करमणुकीची आणि कलावंत घडविणारी कला संपलेली दिसेल अशी भीती तीन पिढ्यापासून राजकमल सर्कस चालविणारे मालक रफिक शेख यांनी माझाशी बोलून दाखवली. विष्णुपंत छत्रे या मराठी माणसाने 1880 साली महाराष्ट्रात सर्कस सुरु करून सुवर्णकाळ दाखवला होता. यानंतर देशभरात साडेतीनशेपेक्षा जास्त सर्कस जोरात चालत होत्या . आज मात्र देशभरात बोटावर मोजण्याइतक्या सर्कस राहिल्या असून महाराष्ट्रात उरलेली एकमेव सर्कस देखील आता अंतिम घटका मोजत आहे.
रोजगार नसल्याने आता रडायची वेळ
जगाला हसविण्याचे काम करणाऱ्या आमच्यावर आता रडायची वेळ आल्याचे या सर्कसमधील तीन फुटाचा जोकर बाबुलाल सांगतो. आतातरी शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला मदत करण्याची विनंती बाबुलाल करतो आहे. पूर्वी ज्या पद्धतीने सर्कस पाहायला मायबाप प्रेक्षक गर्दी करीत तसे चित्र आता राहिले नसून आम्ही जगायचे कसे हा प्रश्न असल्याचे गोपाळ खंडागळे हा झुल्यावर कसरत करणारा गोपाळ खंडागळे सांगतो. आम्ही 365 दिवस काबाडकष्ट करतो आणि 10 लोकांचे कुटुंब जगवतो पण आता परिस्थिती खूपच अवघड बनत चालल्याचे राम हे कलावंत सांगतात. राम हे गेल्या 40 वर्षांपासून या सर्कसमध्ये काम करत आहेत.
पाळीव प्राण्यांना सर्कसमध्ये परवानगी द्या, सर्कस मालकांची मागणी
राजकमल या सर्कसची सुरुवात 25 डिसेंबर 1969 साली सोलापूर येथील लाडले साब शेख यांनी सुरु केली होती . आज त्यांच्या तिसऱ्या पिढीतील रफिक शेख 82 जणांचे कुटुंब या सर्कसवार चालवत आहेत. रोज किमान 35 ते 40 हजाराचा खर्च आणि सर्कसच्या खेळाला निम्म्यापेक्षा जास्त मोकळ्या खुर्च्या अशा परिस्थितीत खर्चाचा मेळ घालणे खूप अवघड असल्याचे रफिक सांगतात. तसे पाहता बैलगाडा शर्यती सुरु झाल्या , घोडा गाड्या आणि टांगे सरकारला चालतात मात्र सर्कसमध्ये किमान पाळीव प्राण्याला परवानगी देण्यासही शासन तयार नसल्याची खंत रफिक बोलून दाखवतात . कुत्रे , घोडे , उंट , पक्षी असे पाळीव पक्षी आणि प्राणी यांना परवानगी दिल्यास प्रेक्षक संख्या वाढू शकते अशी अपेक्षा रफिक शेख यांनी बोलून दाखवली.
कलावंतांना पेन्शन योजना सुरु करा
सध्या सर्कस अखेरची घटका मोजत असून काही दिवसांनी सर्कस बंद झालेली दिसेल अशीही भीती शेख यांनी व्यक्त केली. केरळ सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही सर्कसला आर्थिक मदत केल्यास कलावंतांना पेन्शन योजना सुरु केल्यास या कौटुंबिक करमणूक खेळास नवसंजीवनी मिळू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्कसमधून लहान मुलांनाही बंदी घातल्याने आता कसरतीचे खेळ करणारे कलावंत तयार होणे बंद झाल्याचेही त्यांनी सांगितले .
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे प्रेक्षकांची सर्कसकडे पाठ
सध्याच्या वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावामुळे प्रेक्षकांनीही सर्कसकडे पाठ फिरविली आहे . काही वर्षांपूर्वी कोणत्याही गावात सर्कस आली की लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच सर्कस पाहण्यासाठी गर्दी दिसायची . आता त्याची जागा मोकळ्या खुर्च्यांनी घेतली आहे. हे चित्र नक्कीच चांगले नसल्याचे प्रेक्षक सांगतात. असे झाले तर आमच्या मुलांना आम्हाला सर्कस अशी होती हे चित्रे दाखवून सांगावे लागेल असे एका शाळेच्या शिक्षिकेने सांगितले. आजही लहान मुलांना सर्कसचा ओढा थोडाफार टिकून आहे तो सर्कसमधील विदुषकांच्या आकर्षणामुळे , लहान मुले या विदुषकाचे खेळ पाहण्यासाठी येत आहेत .
सर्कसला मोठा फटका
सोशल मीडिया, केंद्र सरकारने प्राण्यांवर घातलेली बंदी तसेच लहान मुलांना सर्कसमध्ये काम करण्यास बंदी या अशा अनेक गोष्टींचा सर्कसला मोठा फटका बसलाय . सर्कस चालवण्यासाठी द्यावे लागणारे जागा भाडे, लाईट बिल त्याचबरोबर कलाकारांना मानधन देऊन हा सर्कसचा गाडा ओढणाऱ्या व्यवसायाला जगविण्यासाठी आता सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यामधील गोरगरीब कलावंत करत आहेत . अन्यथा पुढच्या पिढीला सर्कस म्हणजे काय हे पुस्तकातूनच पहावे लागेल.
हे ही वाचा :