सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन, प्रणिती शिंदेंचा आरोप; आता भाजपकडून जोरदार पलटवार, म्हणाले...
Solapur News : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता.
सोलापूर : सोलापुरात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पिलावळ्यांचा दंगली (Riots in Solapur) घडवण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला होता. आता प्रणिती शिंदेंवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे.
सोलापुरात ज्या ज्या वेळी दंगल झाली त्या त्या वेळी कोणाची सत्ता होती? सोलापूरच्या दंगलीमध्ये कोणाची पिलावळ सहभागी होते? असा पलटवार भाजपचे आमदार तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रणिती शिंदेंवर केला आहे.
प्रणिती शिंदेंवर भाजपचा जोरदार पलटवार
सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, प्रणिती शिंदे या आता खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी आता विकासाच्या मुद्यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि सुसंस्कृत नेते आहेत, त्यांच्यावर अशी खोटी टीका करू नये. प्रणिती शिंदे प्रत्येकवेळी अतिरेकी अतिरेकी का करतात? मागच्या वेळी देखील पुलवामा भाजपने घडवल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानच्या संसदेत त्यांचे नेते कबूल करतात की त्यांनी पुलवामा घडवलं, मग प्रणिती शिंदे अशांना क्लीनचिट देण्यासाठी भाजपवर आरोप करतात का? सोलापुरात ज्या ज्या वेळी दंगल झाली त्या त्या वेळी कोणाची सत्ता होती? सोलापूरच्या दंगलीमध्ये कोणाची पिलावळ सहभागी होते?
नेमकं काय म्हणाल्या होत्या प्रणिती शिंदे?
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टार्गेट केले होते. प्रणिती शिंदे यांनी म्हटले होते की, जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. ते कानात सांगितले गेले होते. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झाले होते. सिपींनी सांगितले होते की, जा बाहेर नाहीतर या उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळले होते की, निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांची मतदानाच्या पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, त्यातून तुम्हाला हेच दिसेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळ्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला होता.
आणखी वाचा