Ashadhi Wari : पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांचा मार्ग होणार खडतर, वाखरी-पंढरपूर रस्त्याचं काम रखडलं
Pandharpur Wari 2024 : वाखरी ते विसावा या मार्गावरील कामे सुरुवातीला 10 जूनपर्यंत पूर्ण करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. यानंतर पुन्हा या ठेकेदाराला 25 जून पर्यंतची वेळ वाढवून दिली आहे.
सोलापूर : गेल्या वर्षी आषाढी सोहळ्याची कामे रखडल्याचे वृत्त 'ABP माझा'ने दाखवल्यावर मुख्यमंत्र्यांनी यात्रेपूर्वी येऊन तयारीची पाहणी केल्याने कशीतरी कामे पूर्ण होऊ शकली होती. यंदाही त्यापेक्षा गबाळ कारभार सध्या सुरु असून वाखरी ते पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्गातून सुरु असलेले काम रखडल्याने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या लाखो भाविकांचा मार्ग खडतर बनविणार आहे. महत्वाचे म्हणजे ज्या वाखरी पालखी तालावर सर्व मोठे पालखी सोहळे एकत्र येऊन 12 ते 15 लाखांचा भाविकांचा सागर पंढरपूरकडे जातो त्या मार्गाचीच कामे रखडली आहेत. यामुळे पालखी सोबत येणाऱ्या भाविकांना पंढरपूरपर्यंत पोहोचताना अनेक अडथळ्यांना पार करीत आणि त्रासाला सामोरे जात हा पाच किलोमीटरचा मार्ग पूर्ण करावा लागणार आहे.
वाखरी ते पंढरपूर मार्गावर केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सिमेंट महामार्ग मंजूर केला आणि त्याला जवळपास 82 कोटींचा निधी देखील वर्ग केला. मात्र वाखरी ते इसबावी या मार्गावर गेल्या सहा महिन्यापासून काम सुरु करूनही योग्य नियोजन होत नसल्याने कामे अर्धवट अवस्थेत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने याचा पाठपुरावा करीत असले तरी एकाचवेळी सर्वच ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने आता कामे पूर्ण करताना अडचणी समोर येत आहेत.
वाखरी पालखी तळाच्या बाहेत पडताना फक्त रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊ शकली असून त्यातूनही लोखंडी बार बाहेर आले असल्याने भाविकांसाठी हे फार धोकादायक बनणार आहे. किमान वाखरी पालखी तळाच्या परिसरात दुहेरी रास्ता पूर्ण करणे गरजेचे होते. याशिवाय वाखरी ते विसावा या मार्गात ठिकठिकाणी मोठे मोठे चढ कमी करून सपाटीकरण केल्याने शेजारच्या रस्त्यात फार मोठा उंचीत फरक पडला आहे.
अशावेळी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरकडे येत असताना या धोकादायक ठिकाणी तातडीने बॅरेकेटिंग करावे लागणार आहे. याच मार्गावर असणाऱ्या पुलाची कामेही रखडल्याने आता ही कामे कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. कामे वेळेत करण्यासाठी वेगाने कामे उरकल्यास कामाचा दर्जा कसा राखू शकणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
अगदी माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी विसावा येथे येते तेथे उभे रिंगण होत असते. मात्र येथील पुलाचे कामही अर्धवट राहिल्याने पालखी सोहळा येण्यापूर्वी ही कामे पूर्ण करून घेणे प्रशासनाच्या समोर मोठे आव्हान ठरणार आहे. अशातच पुढेही काही ठिकाणी खोदकामाला मूर्खपणासारखी सुरुवात केल्याने आता मुख्यमंत्र्यांनीच पाहणी केल्याशिवाय भाविकांना आषाढी सुकर होऊ शकणार नाही असे चित्र आहे.
वाखरी ते विसावा या मार्गावरील कामे सुरुवातीला 10 जूनपर्यंत पूर्ण करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. यानंतर पुन्हा या ठेकेदाराला 25 जून पर्यंतची वेळ वाढवून दिली असली तरी ही कामे पूर्ण नाही झाली तर लाखो वारकऱ्यांना वाखरी ते विसावा हे अंतर पार करणे फारच त्रासाचे आणि जिकिरीचे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी थोडे आधी येऊन प्रशासनाला याबाबत आदेश दिले तर पालखी सोहळ्याला देवाच्या दारात प्रवेश करताना परमानंद अनुभवायला मिळेल एवढे मात्र नक्की.
ही बातमी वाचा :