(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News : स्मार्ट सिटी खरेदी करणार 25 ई-बस, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे काही दिवसांपूर्वी 15 ई-बसेससाठी टाटा सोबत करार केला होता. आता पुन्हा 25 बसेससाठी प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.
नागपूर: नागपूरला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे पर्यावरणपूरक 25 इलेक्ट्रिक मिडी बस खरेदी करण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यापूर्वी 15 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्स सोबत करार करण्यात आला आहे. आता यामध्ये आणखी 25 बसेसची भर पडणार आहे. बस खरेदी करण्यासाठी रु. 35 कोटीच्या प्रस्तावाला सुद्धा संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.
75 ठिकाणी सायकल स्टॅन्ड
याव्यतिरिक्त नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने नागपूर शहरात विविध 75 ठिकाणी सायकल स्टँड उभारणे आणि त्यावर जाहिरातीद्वारे उत्पन्न प्राप्त करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कोरोना काळात नागपूर शहरात सायकलचा वापर वाढला आहे आणि आरोग्यासाठी तसेच कामावर जाण्यासाठी लोक सायकलचा वापर करीत आहेत. त्यांच्यासाठी सुरक्षित सायकल स्टँड उभारण्याच्या दृष्टीने नागपूर स्मार्ट सिटीतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर रू. 1.39 कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले.
दोन उद्यानांचे सौंदर्यीकरण
नागपूर स्मार्ट सिटीतर्फे शहरातील सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येणार आहे. शहरातील दोन उद्यानांचा या सौंदर्यीकरणात समावेश आहे. सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यान आणि दत्तात्रय नगर येथील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी उद्यान येथे सार्वजनिक कला शिल्प (Public Realm and Art) उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एजन्सीला कार्यादेश देण्यात आले आहे. या कामावर जवळपास 54 लाख पेक्षा जास्त निधी खर्च होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या