(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्कवर, देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये नागपूरची निवड
'योगा फार ह्युमॅनिटी' या थीमवर 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा होणार आहे. या अंतर्गत नागपूरातील मुख्य कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे होणार असून शहरातील इतर योगा केंद्रांनीही जय्यत तयारी केली आहे.
नागपूरः बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान असलेल्या प्राचीन भारतीय योग चिकित्सेला संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशातल्या 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा होणार आहे. नागपूर शहरात कस्तुरचंद पार्कवर यानिमित्ताने मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सन 2015 पासून 21 जून हा संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी 21 जून 2022 ला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात येत असल्याने आयुष्य मंत्रालयामार्फत देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांवर साजरा करण्यात येणार आहे. देशभरातील 75 प्रसिद्ध स्थळांमध्ये देशाचा मध्यभाग असणाऱ्या 'झिरो माईल्स 'च्या नागपूरचीही निवड झाली आहे. देशभरात आयुष मंत्रालयामार्फत 75 प्रसिद्ध स्थळांवर योग दिन आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनात नागपूरमध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पुढाकाराने हा आंतरराष्ट्रीय योग दिन कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात येत आहे.
'योगा फार ह्युमॅनिटी'
या योग दिनाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, एनएसएस,एनसीसी, पोलीस, योग संस्था, नेहरू युवा केंद्र व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होणार आहे. सामान्य नागरिकांना देखील यामध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 पर्यंत योगाभ्यासाची प्रात्यक्षिके करण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे. यावर्षी योग दिवसासाठी 'योगा फार ह्युमॅनिटी' ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यासाठी कस्तुरचंद पार्कवर 21 जूनला सकाळी सात पूर्वी पोहचण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
योगा केंद्र, उद्यानातही कार्यक्रम
कोरोनामुळे बंद असलेले योग अभ्यासकेंद्र आता सुरु झाले असल्याने नागरिकांची चांगली वर्दळ सुरु आहे. कोरोनामुळे नागरिकांकडूनही नैसर्गिक पद्धतीने जीवनशैलीला पसंती दिली जात असल्याने योगाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. याआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लहान योगा केंद्रांवर तसेच उद्यानातही नागरिकांकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.