आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी पडली ती 'या' दोघांमुळेच; शहाजीबापूंनी स्पष्टच सांगितलं
Shahaji Bapu Patil on Uddhav Thackeray : शिवसेनेच्या दोन राऊतांमुळे आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी पडली, असं म्हणत शहाजीबापूंनी थेट संजय राऊत आणि विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे.
Shahaji Bapu Patil on Uddhav Thackeray : आमच्यात आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात दरी पडली, त्यात शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, या दोघांसोबतच आणखी दोघं-तिघं यासाठी कारणीभूत असल्याची टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केली आहे. टीका करत असताना शहाजी बापू पाटील यांनी यावेळी थेट शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीकास्त्र डागलं. तसेच, आपल्या भाषणात शाहजीबापुंनी थेट विनायक राऊतांना पाडण्याचा चंगच बोलून दाखवला.
"अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोडली आहे. या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आलाी.", असं स्पष्ट करत असताना विजय मुरजी पटेल यांचाच होईल, असं विश्वासही व्यक्त केला.
आगामी काळात राज्याच्या हितासाठी मनसे, भाजप आणि शिंदेगटाची युती व्हावी : शहाजीबापू पाटील
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं भेटीगाठींचं सत्र रंगल्याचं दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात मनसे, भाजप आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याची शक्यता कितपत आहे. यासंदर्भात शहाजीबापूंना विचारलं असता, ते म्हणाले की, "100 टक्के येत्या काळात ही युती होऊ शकते." यासंदर्भात तुमचं मत काय? अशी विचारणा केली असता, ही युती व्हाहीच, राज्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी अशी युती निश्चितपणानं व्हावी, असंही शाहजीबापू पाटील यांनी सांगितलं.
पाहा व्हिडीओ : शिवसेनेतील 'या' दोन नेत्यांमुळे आमच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये दरी पडली
शिंदे गटाला निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हावर शिख गटानं आक्षेप घेतला आहे. त्यासंदर्भात बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, "ढाल तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. महाराजांनी आणि मावळ्यांनी ढाल तलवार हातात घेऊन हिंदवी स्वराज्य उभं केलं होतं. आमचं चिन्ह हे ऐतिहासिक परंपरेवर चिन्ह आहे. त्यामुळे शीख बांधवांनी असा दावा करणं चुकीचं आहे. आज शीख, उद्या राजस्थान मधील राजपुत, कर्नाटक मधील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. हे चिन्ह निवडणूक आयोगानं आम्हाला दिलेलं आहे. शीख बांधवांतील एखाद्या पक्षाने क्षत्रीयांचं चिन्ह घेण्याचा सल्ला शहाजीबापूंनी दिला आहे.
"शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव हे तात्पुरतं गोठवलेलं आहे. हा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी घेतलेला निर्णय आहे. अंधेरी पोटनिवडणूक झाल्यानंतर चिन्हाबाबत उत्तर मिळेल. कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी आमच्यावर भाजपमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. एकनाथ शिंदे समर्थपणे हा पक्ष चालवतील. आज 50 आमदारांचा पक्ष उद्या 80 ते 90 आमदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाईल.", असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
"ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आणि आगामी काळात वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील.", असंही शहाजीबापूंनी सांगितलं.