(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवाजी महाराजांचा नवा पुतळा साकारण्याची जबाबदारी या अनुभवी शिल्पकाराला; अजित पवारांचे संकेत, म्हणाले....
प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं तारतम्य ठेवावं, असं म्हणत अजित पवारांनी किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलं आहे. त्यासोबतच नवा पुतळा कोण उभारणार, याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे.
Ajit Pawar at Rajkot Fort : सिंधुदुर्ग : अजित पवारांनी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बोलताना दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. तर याच ठिकाणी शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारण्याचा निर्णय झाला, असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. प्रत्येक नेत्यानं, कार्यकर्त्यानं तारतम्य ठेवावं, असं म्हणत अजित पवारांनी किल्ल्यातल्या राड्यावरून सुनावलं आहे. त्यासोबतच नवा पुतळा कोण उभारणार, याबाबतही अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दोन दिवसांपुर्वी जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे या सगळ्यांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटतायत, मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी यासंदर्भात मला माहिती दिली. अनावरणाच्या वेळी सगळं चांगलं आणि व्यवस्थित होतं. लवकरात लवकर चांगल्यात चांगला पुतळा कसा उभारता येईल? यासाठी आम्ही चर्चा केली. काही लोक असं म्हणतात की, गेल्या वेळस घाई झाली होती, त्यासंदर्भात लोकांनी भाष्यही केलं."
संपूर्ण प्रकरणाची बारकाईनं चौकशी आणि तपास सुरू आहे जो कुणी गुन्हेगार आहेत ते पळून-पळून कुठे जातील, देशाच्या बाहेर तर जाणार नाही, असंही अजित पवार म्हणाले. त्यासोबतच राम सुतारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पुतळ्याच्या पुढील घडणीसंदर्भात चर्चा झाली प्रत्येकानं आपापलं तारतम्य बाळगलं पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे (ठाकरे-राणे राडा) पुतळा पुन्हा उभारण्याचं काम ज्याला दिलं जाईल, त्याचा सगळा इतिहास-अनुभव लक्षात घेऊनच केला केला जाईल, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचं काम ज्यांना दिलं जाईल, त्यांचा पूर्वानुभव लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी केल्या जातील, त्या करत असताना, वेळेचा अपव्यय टाळून गरजेपुरता जेवढा वेळ आहे, तो वेळ देऊन काम पूर्ण केलं जाईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
राम सुतार नेमके कोण?
अयोध्येतील कुबेर टेकडीवर स्थापन करण्यात आलेली 300 फुट उंचीची पितळेची जटायूची मूर्ती राम सुतार यांनी घडवलेली आहे. ही मूर्ती पद्मश्री राम वानजी सुतार यांनी त्यांचा मुलगा अनिल यांच्या मदतीनं नोएडा येथील त्यांच्या कार्यशाळेत बनवली आहे. आतापासून नाहीत तर गेल्या 70 वर्षांपासून शिल्प बनवत आहेत. आपल्या 98 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आतापर्यंत 8 हजारांहून अधिक शिल्प घडवली आहेत. राम सुतार यांना त्यांच्या आयुष्यातील पहिली ऑर्डर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिली होती. 1947 साली राम सुतार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा बनवण्यास सांगितलं होतं. सध्या राम सुतार यांनी तयार केलेला पुतळा संसद भवनात बसवण्यात आला आहे. तेव्हापासून सुतारांनी अनेक उत्कृष्ट पुतळे बनवले आहेत, ज्यात 45 फूट उंच चंबळ देवी पुतळा, 21 फूट उंच महाराजा रणजित सिंह पुतळा, 18 फूट उंच सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, 9 फूट उंच भीमराव आंबेडकर पुतळा इत्यादींचा समावेश आहे. आता सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याचं काम राम सुतारांना दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.