(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg Rains : चक्रीवादळाचा कोकणात परिणाम; अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार चिंताग्रस्त
Sindhudurg Rains :अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस पडत असल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे.
Sindhudurg Rains : नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मंदोस चक्रीवादळाचा (Mandous Cyclone) परिणाम कोकणातही (Konkan) पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या (Rain) हलक्या स्वरुपाचा सरी पडत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा (Mango), काजू (Chashwe) बागायतदारांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे आधीच मोहोर काळवंडला आहे. त्यातच आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस पडत असल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. चक्रीवादळामुळे (Cyclone) कोकणात अवकाळी पावसाचा परिणाम जाणवत असून वेधशाळेने पुढील चार दिवस अलर्ट दिला आहे.
सिंधुदुर्गातील आंबा-काजू बागायतदार चिंताग्रस्त
अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदोस चक्रीवादळामुळे कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहे. त्यातच यंदा हापूस आंब्याचा हंगाम 50 ते 60 दिवस उशिराने सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. तर फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमतीत दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे फवारणीवर होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचा ताळमेळ देखील बसत नाही. या स्थितीमुळं आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
मंदोस चक्रीवादळाचा जोर ओसरला
तामिळनाडूतील (Tamil Nadu) किनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदोस चक्रीवादळाचं अस्मानी संकट पाहायला मिळत आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकलं, त्यानंतर शनिवारी (10 डिसेंबर) तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला. चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झालं. असं असलं तरी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा फटका कमी बसला आणि जास्त नुकसान झालं नाही.
आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज
दरम्यान महाराष्ट्रावरही चक्रीवादळाचा परिणाम झाला असून 11 ते 13 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसंच मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात आठवडाभर म्हणजे 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
VIDEO : Sindhudurg Hapus : अवकाळी पावसाचा हापूस आंब्याला फटका, ढगाळ वातावरणामुळे मोहोर काळवंडला