Uday Samant : उदय सामंत यांच्या भावाच्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठाकरे गटाची मशाल, नंतर डीलिट केला; शिंदे गटाची धाकधूक मात्र वाढली
Kiran Samant WhatsApp DP : किरण सामंत यांनी पहिला ठाकरे गटाची मशाल असलेला डीपी ठेवला, नंतर तो काढला. मात्र यावर आता जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.
मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअॅप डीपीमुळे (Kiran Samant WhatsApp DP) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.. किरण सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप डीपीला ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह लावलं होतं.. जो होगा, वो देखा जाएगा असं कॅप्शन त्याखाली लिहिण्यात आलं होतं.. काही वेळानंतर किरण सामंत यांनी व्हॉट्सअॅप डिपी डिलीटही केला.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत. पण त्यांच्या थोरल्या भावानं म्हणजे किरण सामंत यांनी ठाकरे गटाचं चिन्ह असलेली मशाल त्यांच्या व्हॉट्सअॅप डीपीला ठेवली होती. 'जो होगा वो देखा जाएगा' असं त्यांनी त्याखाली स्टेटसही ठेवलं होतं. ही गोष्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यांनी तो डीपी काढला आणि स्टेटसही बदललं. मात्र त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया मात्र उंचावल्या. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा रोख नितेश राणेंकडे की आणखी कुणाकडे आहे याची चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये यासाठी...
यानंतर किरण सामंत याची प्रतिक्रिया विचारल्यानंतर ते म्हणाले की, मी उगाचच खोटं बोलत नाही. तसंच स्पष्ट आणि खरं बोलण्याचा मी आवही आणत नाही. काही भंपक लोक आपण स्पष्ट बोलत असल्याचा आव आणतात. तसंच स्वत:कडचं झाकून ठेवून दुसऱ्यांकडचं वाकून बघायची काहींना सवय असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये म्हणून मी स्टेटस बदललं.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग ही लोकसभेची सीट महायुतीचीच असेल असं सांगत ते म्हणाले की, वेळ आल्यानंतर मी स्पष्ट आणि करारी कोण आहे हे आव आणणाऱ्या लोकांना दाखवून देणार. फ्री हिटवर षटकारही ठोकणार आहे.
किरण सामंत यांच्या वक्तव्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, किरण सामंत सध्या कोणत्या पक्षात आहेत हे माहिती नाही. किरण सामंत यांनी भाजपमध्ये यावं, मग त्यांना जर उमेदवारी हवी असल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. ज्यावेळी राज्यात सत्तांतरणाची प्रक्रिया सुरू होती त्यावेळी त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचं दिसून आलं होतं. आता मात्र त्यांच्या थोरल्या भावानेच ठाकरे गटाच्या मशालीचा फोटो डीपीला ठेवला होता. हा फोटो जरी डीलिट केला असला तरीही शिंदे गटाची धाकधूक मात्र चांगलीच वाढली आहे.
किरण सामंतांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या डीपीचा नेमका अर्थ काय? याविषयी सध्या चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान तोंडावर आलेलं असल्यानं काही प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील हे नक्की.
ही बातमी वाचा: