Kankavli politics : कणकवलीचं राजकारण नेमकं काय? शिंदे गटासोबत युतीवरुन उद्धव ठाकरे नाराज का झाले? इनसाइड स्टोरी
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : कोणत्याही स्थितीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका अशा सूचना उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

मुंबई : कोकणातल्या सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी (Kankavli politics) आगळे वेगळे समीकरण तयार करून शहर विकास आघाडीचा प्रस्ताव बैठकांनंतर चर्चेत आला. यामध्ये ठाकरेंची शिवसेना (Uddhav Thackeray Shivsena) आणि शिंदे यांची शिवसेना (Eknath Shinde) याच शहर विकास आघाडीमध्ये एकत्र येणार अशी चर्चा रंगली. आता हाच प्रस्ताव घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेले, त्यावेळी या प्रस्तावावर उद्धव ठाकरे तीव्र नाराजी यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कणकवलीतील स्थानिक राजकारण नेमकं काय आणि त्यावर ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी नेमकी काय आहे?
Kankavli Shivsena Yuti : दोन्ही शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वी माजी आमदार वैभव नाईक आणि नुकतेच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले राजन तेली यांची बैठक पार पडली.. नगरपंचायतीत भाजपला शह देण्यासाठी एक रणनीती यामध्ये आखली गेल्याची माहिती आहे.
या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत इतर पक्ष एकत्रित करून शहर विकास आघाडी या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तयार करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं समोर आलं. हा प्रस्ताव घेऊन पक्षश्रेष्ठींकडे जाऊन यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असेही स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आलं.
Uddhav Thackeray On Eknath Shinde Yuti : उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी
याच शहर विकास आघाडी संदर्भात जेव्हा उद्धव ठाकरे आपला मराठवाड्याचा दौरा करून मुंबईत आले तेव्हा सिंधुदुर्ग मधील स्थानिक नेत्यांची पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. शहर विकास आघाडीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करणे हे का महत्त्वाचं आहे हे स्थानिक नेत्यांनी, यामध्ये वैभव नाईक आणि संदेश पारकर व इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
भाजपची कोंडी करण्यासाठी त्या ठिकाणचे स्थानिक राजकारण आणि समीकरण उद्धव ठाकरे समोर मांडलं. मात्र यावर उद्धव ठाकरे यांनी सगळं ऐकून घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरे नाराज नाहीत, मात्र त्यांना आम्ही या ठिकाणची स्थानिक राजकीय परिस्थिती सांगितली असं माजी आमदार वैभव नाईक म्हणाले. तर कुठल्याही परिस्थितीत शिंदे गट आणि भाजपसोबत युती आघाडी करायची नाही अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असं माजी खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाऊ नका, ठाकरेंच्या सूचना
मराठवाड्याच्या दौऱ्यात सुद्धा, उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढण्याचा प्रयत्न करा, मात्र शिंदे सेनेसोबत सोबत कुठल्याही प्रकारे युती आघाडी करू नका असं त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या सूचना दिलेल्या असताना जेव्हा कोकणातून अशाप्रकारे प्रस्ताव समोर आला तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय सांगताना तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
आता यावर शिंदे यांच्या शिवसेनेकडून सध्या तरी मौन बाळगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका यावर जरी समजली नसली तरी नेत्यांनी मात्र सिंधुदुर्गमध्ये महायुती म्हणून लढणार असल्याचे स्पष्ट केलं.
नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या काळात महायुती, महाविकास आघाडीमधील पक्षांची वेगवेगळे समीकरणे पाहायला मिळतील. अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजप पक्षाला अडचणीत आणण्यासाठी युती-आघाड्या होतील. मात्र आघाडी युतीमध्ये शिंदेंच्या सेनेसोबत न जाण्याचा एक प्रकारे संकेत आणि सूचना उद्धव ठाकरेंनी राज्यभर आपल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दिल्याचा पाहायला मिळतंय.
ही बातमी वाचा:
























