Rabbit Day : आंतरराष्ट्रीय ससा दिवस, इंजिनीअरची नोकरी सोडून तरुण करतोय ससे पालन, महिन्याला मिळवतोय 90 हजारांचा नफा
Rabbit Day : कोकणातील एका तरुणानं इंजिनीअरची (Engineer) नोकरी सोडून ससे पालनाचा व्यवसाय (Rbbit farming) सुरु केला आहे.
International Rabbit Day : आज (24 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय ससा दिवस (International Rabbit Day) आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय ससा दिवस साजरा केला जातो. घरगुती आणि जंगली सशांचं संरक्षण करण्यासाठी हा ससा दिवस साजरा केला जातो. आजच्या या ससा दिवसाच्या निमित्तानं आपण एक खास स्टोरी पाहणार आहोत. कोकणातील एका तरुणानं इंजिनीअरची (Engineer) नोकरी सोडून ससे पालनाचा व्यवसाय (Rbbit farming) सुरु केला आहे. या तरुणाने हा व्यवसाय नेमका कसा सुरु केला? सशांचे संगोपन कसं केलं जातं? याच संदर्भातील माहिती आज आपण पाहणार आहोत.
निलेश गोसावी यांच्याकडे 6 प्रजातीचे 200 पेक्षा जास्त ससे
निलेश गोसावी असे ससे पालनाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे हे त्यांचे गाव. त्यांचे इंजिनीअरींगचे शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी लागली होती. ती नोकरी सोडून निलेश गोसावी यांनी कोरोना काळात घरी येऊन ससे पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. निलेश यांनी हरियाणामध्ये जाऊन यासाठी ट्रेनिंग घेतले आहे. हा व्यवसाय सुरु करताना त्यांनी 10 युनिटनी सुरुवात केली होती. त्यासाठी त्यांना 3 लाख 50 हजार रुपये लागले होते. त्यासाठी शेड उभारण्यासाठी 2 लाख 50 हजार असे एकूण 6 लाखात त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यासाठी ससे सुध्दा हरियाणामधून आणले. त्यांच्याजवळ एकूण 6 प्रजातीचे ससे आहेत. ससे पालन करताना ते योग्य ती काळजी घेतात.
महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा
सशांचा उपयोग हा घरी पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि प्रयोगशाळेत केला जातो. सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग जवळील गोव्यात मोठी मागणी आहे. ससाच्या मटणात कोलेस्टेरॉल आणि फॅट अगदी नगण्य आहेत. हे पांढर मटण असतं. यामध्ये प्रोटीन आणि विटामिन खूप आहेत. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे मानले जाते. निलेश गोसावी यांच्याजवळ 200 पेक्षा जास्त ससे आहेत. ते पाळण्यासाठी 450 रुपयाला सशाची विक्री करतात. तर ससाचं मटण 600 रुपये किलोने विकतात. त्यामुळं त्यांना महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. आगामी काळात युवकांना प्रशिक्षण देऊन तरुणांना या व्यवसायात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती निलेश गोसावी यांनी दिली आहे.
कोकणातील वातावरण ससेपालनासाठी पोषक
कोकणात ससे पालन करणं खूप सोप्प आहे. कारण कोकणातील वातावरण आणि तापमान सशांसाठी खूप रुचकर आहे. -5 से. ते 35 से. तापमान त्यांना आवश्यक असतं. ते कोकणात आहे. गहू, मका, सोयाबीन यांचा भरड, कोबी आणि फ्लॉवरची पान हा चारा सशांचे खाद्य आहे. ससाची विष्टा ही ऑरगॅनिक खत म्हणून वापरु शकतो. सशाचं मूत्र मिरजमधील द्राक्ष बागायदार घेऊन करतात. हे मूत्र कीटकनाशक म्हणून वापरतात. मूत्र 10 रुपये लिटर तर पेंडी 20 रुपये किलो ने विकत असल्याचे निलेश गोसावी यांनी सांगितले. त्यामुळं ससे पालन हा कोकणात एक उदयोन्मुख उद्योग असल्याचे निलेश यांनी सांगितलं.
आंतरराष्ट्रीय ससा दिवसाविषयी
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय ससा दिवस साजरा केला जातो. घरगुती आणि जंगली सशांचं संरक्षण करण्यासाठी हा ससा दिवस म्हणून पाळला जातो. पहिला आंतरराष्ट्रीय ससा दिवस 1998 मध्ये सप्टेंबरच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात आला होता. असे मानले जाते की आंतरराष्ट्रीय ससा दिवस प्रथम यूकेमध्ये साजरा झाला. तिथून ते ऑस्ट्रेलिया आणि नंतर उर्वरित जगात पसरला. जगभरात सशांच्या 30 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. बरेच लोक ससे पाळीव प्राणी म्हणून ठेवतात. ससे अनेक कारणांमुळे चांगले पाळीव प्राणी बनवतात. ते शांत असतात, घरबसल्या पाळणे सोपे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: