(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तळकोकणातील सायकलपटू निघाले कन्याकुमारीला, सहा दिवसांत करणार 1320 किमीचा प्रवास
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ध्येय्यवेडे कुडाळ वरून कन्याकुमारीला सायकलिंग करत निरोगी आरोग्याची जनजागृती करण्यासाठी सहा दिवसात एक हजार 320 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहेत.
सिंधुदुर्ग : निरोगी आरोग्याच्या जनजागृतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सायकलपटू सायकलवरून कन्याकुमारीला निघाली आहे. हे सायकलपटू 1320 किलोमीरचा प्रवास करणार आहेत. रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर हे तीन तरुण कुडाळ ते कन्याकुमारी असा सायकलने प्रवास करणार आहेत. यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सायकलिस्ट असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग या संस्थांनी पुढाकार घेत कुडाळ ते कन्याकुमारी सायकलिंग करण्याचे नियोजन केले आहे.
रूपेश तेली यांनी एका वर्षात 200, 300, 400, 600 किमी अंतर सायकलने पूर्ण करून सुपर रेन्डोनिअर हा बहुमान रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांनी दोनवेळा मिळविला आहे. शिवप्रसाद राणे हे व्यापारी असून सायकलिंगमध्ये त्यांनी सुपर रेन्डोनिअर बहुमान मिळविलेला आहे. तर अमित तेंडुलकर हे सायकलपटू असून ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सेवेत आहेत. कुडाळ ते कन्याकुमारी सायकल चालवण्याची सुरवात आज कुडाळ बसस्थानकासमोर 'आय लव्ह कुडाळ' सेल्फी पॉईंट येथून केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे तीन ध्येय्यवेडे कुडाळ वरून कन्याकुमारीच्या दिशेने सायकलिंग करत निरोगी आरोग्याची जनजागृती करण्यासाठी सहा दिवसात एक हजार 320 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहेत. कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांनी श्रीफळ वाढवून या प्रवासाचा श्रीगणेशा केला. हे सायकलपटू कुडाळ, सावंतवाडी, आंबोलीमार्गे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, टुमकुरू, सालेम, मदुराई, कन्याकुमारी असा प्रवास करणार आहेत. 26 जुलै रोजी हे सायकलपटू पुन्हा सिंधुदुर्गमध्ये परत येणार आहेत. गावकऱ्यांनी या तीन्ही सायकलपटूंचा सत्कार करून त्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. कुडाळ ते कन्याकुमारी हा प्रवास हे सायकलपटू सहा दिवस करणार आहेत. सहा दिवसांनी पुन्हा ते सिंधुदुर्गमध्ये परत येतील.
महत्वाच्या बातम्या