![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar : केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र
Sharad Pawar : शरद पवार यांनी रामलीला मैदानातून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
![Sharad Pawar : केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र Sharad Pawar criticizes Narendra Modi Central government Arvind Kejriwal and Hemant Soren's arrest is an attack on democracy Rahul Gandhi Uddhav Thackeray india alliance mega rally Marathi News Sharad Pawar : केजरीवाल, सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला, शरद पवारांचे रामलीला मैदानातून टीकास्त्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/31/3268047126941c7e3029bcc608150f1f1711878657471923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रामलीला मैदानातून मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे, असे म्हणत संविधानाविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचे आहे, भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance) महारॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीतून शरद पवारांनी तोफ डागली.
ही कारवाई लोकशाहीवर हल्ला
शरद पवार म्हणाले की, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमकावण्यात आले. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असो , अन्य मुख्यमंत्री असो, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. केजरीवाल आणि सोरेन यांची अटक हा संविधानावर हल्ला आहे. ही कारवाई लोकशाहीवर हल्ला आहे, असा टीका शरद पवारांनी मोदी सरकारवर केली आहे.
भाजपच्या विरोधात मतदान करायचंय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी जे संविधान आपल्याला दिले आहे. ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधानाविरोधातील शक्तींना आपल्याला रोखायचे आहे. आता देशात निवडणुका सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रावर तुम्ही जाल तेव्हा लक्षात ठेवा की, भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे. भाजपच्या साथीदारांची विरोधात मतदान करायचं आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.
हे सरकार पडण्याची वेळ आलीय - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या देशातील भारतीय घाबरणारे नसून लढणारे आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आयटी डिपार्टमेंट भाजपचे तीन साथी पक्ष आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले, हेमंत सोरेन यांच्यावर आरोप करत त्यांना तुरुंगात टाकले. ही कोणती पद्धत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पक्षात घेत त्यांच्यावरचे आरोप पुसून टाकण्यात आले. आता त्यांचे 400 पारचे स्वप्न आहे. एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे हे सरकार पडण्याची वेळ आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान, हिंमत असेल तर... : रामलीला मैदानात मोठी घोषणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)