Saudi Arabia Visa Ban 2025: सौदी अरेबिया 14 देशांच्या नागरिकांना व्हिसा देणार नाही, भारतावरही निर्बंध, समोर आलं मोठं कारण
Saudi Arabia Visa Ban 2025: सौदी अरेबियाने (Kingdom of Saudi Arabia) 14 देशांच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान याचा परिणाम हज यात्रेवर ही होणार असल्याची शक्यता आहे.

Saudi Arabia Visa Ban 2025: पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भारतीयांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या वर्षीच्या हज यात्रेपूर्वी, सौदी अरेबियाने (Kingdom of Saudi Arabia) 14 देशांच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित केले आहे. सरकार जून 2025 च्या मध्यापर्यंत उमराह (Umrah), व्यवसाय आणि कुटुंब भेटीसाठी व्हिसा देण्यापासून तात्पुरते स्थगित करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान याचा परिणाम हज यात्रेवर ही होणार असल्याची शक्यता आहे.
तात्पुरते स्थगित, समोर आलं मोठं कारण
सौदीतील एका अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हज यात्रेशी संबंधित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि योग्य नोंदणीशिवाय हज यात्रा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांदरम्यान ही बंदी घालण्यात आली आहे. या उपाययोजनाचा उद्देश गेल्या वर्षीच्या हज चेंगराचेंगरीची पुनरावृत्ती टाळणे हा असल्याचेही बोलले जात आहे. सोबतच तीव्र उष्णतेमुळे आणि नोंदणी नसलेल्या यात्रेकरूंच्या गर्दीमुळे जी दुर्घटना झाली होती, त्याची पुनरावृत्ती परत होऊ नये, या अनुषंगाने ही खबरदारी घेतली जात असल्याचे कारण ही आता पुढे आले आहे. मात्र 14 देशांच्या नागरिकांवरील व्हिसा निर्बंधाचा भारतावरही परिणाम होणार असल्याने अनेकांची निराशा होणार आहे.
या 14 देशांच्या नागरिकांना मिळणार नाही व्हिसा
भारत
पाकिस्तान
बांगलादेश
इजिप्त
इंडोनेशिया
इराक
नायजेरिया
जॉर्डन
अल्जेरिया
सुदान
इथिओपिया
ट्युनिशिया
येमेन
हज यात्रा कधीपासून कधीपर्यंत आहे?
दरम्यान, या निर्णयामुळे राजनैतिक व्हिसा, निवास परवाने आणि हजसाठीचे विशेष व्हिसा प्रभावित होणार नाहीत. 2025 ची हज यात्रा 4-9 जून दरम्यान होणार आहे. दरम्यान, या हालचालीमागील आणखी एक कारण म्हणजे बेकायदेशीर रोजगार हा देखील आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यवसाय किंवा कौटुंबिक व्हिसा वापरणारे परदेशी लोक सौदी अरेबियामध्ये अनधिकृत कामात गुंतलेले आहेत, व्हिसा नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि कामगार बाजारात व्यत्यय आणत आहेत. त्यामुळे यावर सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अधिकाऱ्यांना व्हिसा नियमांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत. सुधारित नियमांनुसार, यावर्षी उमरा व्हिसासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल 2025 आहे. शिवाय, हज संपेपर्यंत कोणताही नवीन उमरा व्हिसा जारी केला जाणार नाही, असेही सांगण्यात येतंय. अनेक माध्यमांच्या वृत्तांनुसार, भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि इतर देशांना सौदी अरेबियाच्या व्हिसा बंदी लागू होईल. या देशांतील यात्रेकरूंसाठी ही घटना निराशाजनक आहे, कारण हजारो लोक पवित्र यात्रेला जातात.
हे ही वाचा
























