Donald Trump : अमेरिकन जनता रस्त्यावर, जगाची अर्थव्यवस्था गटांगळ्या खाऊ लागली अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्या फक्त दोन वाक्यातील प्रतिक्रियेनं कपाळावर हात मारण्याची वेळ!
Donald Trump : रॉयटर्सच्या वृत्तानुसार ट्रम्प म्हणाले की इतर देशांनी आम्हाला खूप वाईट वागणूक दिली कारण आमचे नेतृत्व मूर्ख होते, ज्यामुळे हे होऊ दिले

Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगावर जशास तसा कर लादण्याची घोषणा अवघ्या जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतासह जगाची अर्थव्यवस्था टॅरिफ युद्धाने गटांगळ्या खाऊ लागली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रविवारी अमेरिका आणि जगाच्या बाजारातील घसरणीवर म्हणाले की, 'कधीतरी काही ठीक करण्यासाठी औषध घ्यावे लागते.' एअरफोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. फ्लोरिडामध्ये गोल्फ खेळून ते वॉशिंग्टनला परतत होते. या संभाषणात त्यांनी आपल्या टॅरिफ योजनेतून मागे हटण्याचे कोणतेही संकेत दिले नाहीत.
कारण आमचे नेतृत्व मूर्ख होते
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ट्रम्प म्हणाले की इतर देशांनी आम्हाला खूप वाईट वागणूक दिली कारण आमचे नेतृत्व मूर्ख होते, ज्यामुळे हे होऊ दिले. त्याच वेळी, अमेरिका आणि जगभरातील व्यापार बाजारातील गोंधळावर ट्रम्प म्हणाले, 'बाजाराचे पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु आपला देश आता खूप मजबूत आहे. मार्केट क्रॅशने मला प्रभावित केले नाही कारण ते फक्त थोड्या काळासाठी आहे. मग सर्वकाही सामान्य होईल.
आज 'ब्लॅक मंडे'ची भीती
ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे जगभरातील बाजारात घसरण होत आहे. 6 एप्रिल रोजी, अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर आणि बाजार विश्लेषक जिम क्रेमर यांनी 7 एप्रिल रोजी बाजारात आणखी एक मोठी घसरण होऊ शकते, असा इशारा दिला आहे. हे 1987 च्या काळ्या सोमवारशी जोडले जात आहे, कारण 19 ऑक्टोबर 1987 रोजी जगभरातील शेअर बाजारात एकाच दिवसात सर्वात मोठी घसरण झाली होती. US Dow Jones Industrial Average (DJIA) 22.6 टक्के घसरला होता. इतिहासातील सर्वात मोठी एक दिवसीय घसरण होती. ही घसरण यूएसमध्ये सुरू झाली, परंतु ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि आशियाई बाजारपेठांमध्ये त्वरीत पसरली.
50 देशांनी शुल्काबाबत ट्रम्प प्रशासनाशी संपर्क साधला
ट्रम्प प्रशासनातील ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी NBC ला सांगितले की, 50 हून अधिक देशांनी ट्रम्प प्रशासनाशी शुल्काबाबत संपर्क साधला आहे, परंतु कोणत्याही वाटाघाटींना वेळ लागेल. बेझंट म्हणाले की, हे देश आपल्यासोबत अनेक दिवसांपासून गैरवर्तन करत आहेत. आणि हा मुद्दा काही दिवस किंवा आठवड्यात चर्चेने सोडवला जाऊ शकत नाही. आपल्याला पुढचा मार्ग पाहावा लागेल, कारण जेव्हा एखादा देश 20, 30, 40 किंवा 50 वर्षांपासून चुकीच्या मार्गावर चालत असेल, तेव्हा आपण एका झटक्यात सर्वकाही साफ करू शकत नाही.
अमेरिकेत उत्पादन वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी परस्पर कर लादला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी इतर देशांवर परस्पर कर लादण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारतावर 26 टक्के कर लादण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी ते म्हणाले की, भारत अतिशय कडक आहे. मोदी माझे चांगले मित्र आहेत, पण ते आमच्याशी योग्य वागणूक देत नाहीत. भारताव्यतिरिक्त चीनवर 34 टक्के युरोपियन युनियनवर 20 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, जपानवर 24 टक्के, व्हिएतनामवर 46 टक्के आणि तैवानवर 32 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. अमेरिकेने जवळपास 60 देशांवर त्यांच्या टॅरिफच्या तुलनेत निम्मे शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























