उद्धव ठाकरेंची भाजपवर भुरटे चोर अशी टीका;उदयनराजे भोसले यांचं प्रत्युत्तर, बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं..
Udayanraje Bhonsle : खासदार उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचा बचाव देखील त्यांनी केला.

सातारा : साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदारसंघातील विविध भागांचा दौरा आज केला. कराडमध्ये त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी भाजपवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. याशिवाय फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर देखील उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर
मुंबईत आज झालेल्या निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाहांवर टीका केली आहे. ‘भाजपवाले भुरटे चोर आहेत!’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. ठाकरेंच्या या वक्तव्यावर आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघातील विविध भागात भेटी गाठी सुरु असल्यानं ते काय म्हटले ते पाहिलं नाही मात्र ते त्यांचं मत असेल... पण जर लोकांचंही तसंच मत असतं, तर लोकांनी भारतीय जनता पक्षाला सत्तेत बसवलं नसतं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले पुढं म्हणाले की, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. बोलायचं असेल तर पुराव्यासह बोलावं; एखाद्याचा हात पकडू शकत नाही, तसंच कोणाचं बोलणं थांबवू शकत नाही, असं उदयराजे भोसले यांनी म्हटलं. या प्रकारे कराड येथे माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. भाजपवर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे पाहावं, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.
“निंबाळकरांवर आरोप करणं सोपं, पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चुकीचं” : उदयनराजे भोसले
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर थेट विरोधकांकडून आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, कोण काय बोललं हे मला माहित नाही, पण आरोप करणं हे फार सोपं असतं. मात्र सखोल चौकशी होऊन सत्य उघडकीस येईपर्यंत निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. तपास यंत्रणेला आपलं काम करू द्या. आम्हीही गप्प बसलेलो नाही. तरुणीला निश्चितपणे न्याय मिळवून देण्याचं काम मी करेन.भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणावर नवी राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.


















