(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara SP Samir Shaikh : रिअल सिंगम! सातारा एसपींच्या डोळ्यांसमोर दुचाकी ट्रकखाली, स्वत: गाडीतून उतरून दोघांचा जीव वाचवला
कराडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर सातारच्या दिशेने जाताना एसपींच्या डोळ्यादेखत दुचाकी ट्रकखाली गेली. मात्र, क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने संबंधित दुचाकीस्वारांचा जीव वाचला.
Satara SP Samir Shaikh : खाकी वर्दीचा जसा कधी कधी रागाचा विषय होऊन जातो, तसा कधी कधी असामान्य कामगिरीने सॅल्युटचा सुद्धा विषय होऊन जातो. केरळमधील महिला पोलिस अधिकाऱ्यांन चार महिन्यांच्या बाळाला पोलिस स्टेशनमध्ये स्तनपान केल्याची घटना ताजी असतानाच आता कर्तव्यदक्षतेचं खाकी वर्दीतील आणखी एक उदाहरण सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी ठेवले आहे. कराडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर सातारच्या दिशेने जाताना त्यांच्या डोळ्यादेखत दुचाकी ट्रकखाली गेली. मात्र, क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने संबंधित दुचाकीस्वारांचा जीव वाचला आणि अपघातानंतर होणारी वाहतूक कोंडी सुद्धा टाळली. त्यामुळे रिअल लाईफमधील सिंगमचे दर्शन यावेळी झाले.
प्रसंग नेमका काय घडला?
सातारा जिल्ह्यातील कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर सातारच्या दिशेने निघालेल्या जिल्हा पोलिस प्रमुखांसमोर एक मोटरसायकल थेट ट्रकच्या खाली गेली. मोटरसायकलवरील एक युवक फेकला गेला तर दुसरा पाठीमागच्या दोन टायरमध्ये अडकला. गंभीर जखमी झालेला युवकाच्या अंगावर ट्रकच्या टायरचा काही भाग अडकला होता. अडकलेला युवक मोठ्याने ओरडत होता. आवाजानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी गाडीतून उतरत स्वत:च तत्काळ वाहतूक थांबवली.
पोलिसांची गाडी बघून ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला
वाहतूक रोखल्यानंतर ट्रकच्या टायरमध्ये अडकेल्या युवकाला काढण्याचे प्रयत्न सुरु केले. पोलिसांची गाडी बघून ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून पळून गेला. त्यावेळी समीर शेख यांनी दुसऱ्या ट्रकला तत्काळ रस्त्यातच थांबवून अपघातग्रस्त ट्रक चालवण्यास सांगितले आणि अलगद ट्रक पुढे घेण्यास सांगितले. 15 मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर जखमी युवकाची अडकलेल्या टायरातून सुटका केली.
रुग्णवाहिका नसल्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या एका मोकळ्या रुग्णवाहिकेला एसपी शेख यांनी स्वत: थांबवून त्या दोन्ही जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा पोलिस प्रमुखांनी दाखवलेल्या तत्परतेनं मात्र कमी वेळात दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु झाले आणि वाहतूकही सुरळीत सुरु झाली.
चार महिन्यांच्या निष्पाप बाळाला महिला पोलिस अधिकाऱ्याकडून स्तनपान!
दरम्यान, केरळमध्ये अवघ्या चार महिन्याच्या बाळाच्या आईची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला आयसीयूमध्ये (ICU of Ernakulam General Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्या उपाशी असलेल्या मुलाला स्तनपान करून माणूसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. एमए आर्य असे त्या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या कोची महिला पोलिस स्टेशनच्या सिव्हिल पोलिस अधिकारी आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने बाळाला आपल्या मांडीवर घेतल्याचे छायाचित्रही पोलिसांनी शेअर केले आहे. ज्याचं लोकांकडून कौतुक होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या