Ajit Pawar PC : मला केंद्रातील राजकारणात रस नाही, माझ्यावर राज्यातील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी : अजित पवार
Ajit Pawar PC : मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही, असं अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
Ajit Pawar PC : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. परंतु यावर आता अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नाराज असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, असं अजित पवार म्हणाले. साताऱ्यातील (Satara) पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे (NCP Foundation Day) औचित्य साधत पक्षाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली. त्याविषयी अजित पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. "दिल्लीतील अकरा वाजताच्या मीटिंगला अजित पवार बारा वाजता आले, असं मीडियाने दाखवलं. ती मीटिंग पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही. मी राज्याच्या पातळीवरचा विरोधी पक्षनेता आहे. 12 वाजता मीटिंग सुरु झाली, अनेकांची भाषणं झाली, सत्कार झाले, पवारसाहेबांचं शेवटचं भाषण झालं. आभारप्रदर्शनं झाली आणि शेवटी राष्ट्रगीत झालं. या सगळ्याला दोन वाजेल. माझी पुण्याची फ्लाईट चार वाजता होती. विमानतळावर पोहोचलो. काही कारणामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. अजित पवारांवर कोणतीही जबाबदारी नाही, असं मीडियामध्ये जाणीवपूर्वक दाखवलं. मूळात माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे," असं अजित पवार म्हणाले.
30 ते 32 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात काम करायचं ठरवलं : अजित पवार
मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणात रस नाही. बारामतीकरांनी मला 1991साली निवडून दिलं ते मी सहा महिने तिथे खासदार म्हणून राहिलो. तिथलं चित्र पाहिलं. माझी कामाची पद्धत आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कामाची पद्धत वेगळी आहे. 30 ते 32 वर्षांपूर्वी ठरवलं आपण आपल्या महाराष्ट्रात काम करायचं. तेव्हापासून मी आतापर्यंत महाराष्ट्रात काम करतोय, असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर अजित पवार म्हणाले...
दरम्यान राष्ट्रवादीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याला भाकरी फिरवली म्हणत नाही. ही सरळ सरळ धूळफेक आहे. यावर अजित पवार म्हणाले की, "हा आमचा पक्षांतर्गत निर्णय आहे. भाकरी फिरवली असं मीडियाने म्हटलं. पवारसाहेब भाकरी फिरवली असं म्हणाले नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एखा राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु माझं मत असं आहे की, पक्षांतर्गत भाजपने काय करावं हा त्याचा प्रश्न आहे, तसा राष्ट्रवादीने काय निर्णय घ्यावा हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचे आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्यामुळे टीकाटिप्पणी करतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटत नाही."
राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे : सुप्रिया सुळे
दरम्यान सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. "अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं पद हे मुख्यमंत्री समान असतं. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे.
संबंधित बातमी