Mandhardevi Yatra: साताऱ्यातील मांढरदेवीची यात्रा उद्यापासून, यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू
Satara: सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी तसेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांजळे इथल्या काळुबाई देवीच्या यात्रेला प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले
सातारा: सातारा (Satara News) जिल्ह्यातील मांढरदेवीची (Mandhardevi) यात्रा उद्यापासून सुरु होत आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध याच कालावधीत होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कांजळे इथल्या काळुबाई देवीच्या यात्रेलाही लागू असणार आहेत 2005 मध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर या गडावरील यात्रा पूर्णपणे शासकीय ध्येयधोरणात पार पाडली जाते.
मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध
- यात्रेच्या काळात पशुहत्या करण्यास मनाई असे.
- कोंबड्या, बकऱ्या, बोकड इत्यादी प्राण्यांच्या या भागात वाहतुकीस मनाई असेल.
- मांढरदेव परिसरात वाद्ये आणण्यास आणि वाजवण्यास मनाई असेल.
- मांढरदेव परिसरातील झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहुल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती करणे, करणी करणे यास बंदी असेल.
- मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहण्यास मनाई असेल.
- मंदिर परिसरात मद्य बाळगणे आणि पिण्यास यास मनाई असेल.
गडावरच्या भाविकांच्या गर्दीमुळे पूर्वी या ठिकाणी नारळ, तेल, लिंबू यांचा मोठा सडा येथे पाहायला मिळायचा. या ओलाव्यातून घसरडे झालेल्या पायऱ्यांवरुन काही भाविक घसरले जात होते. याच कारणातून 2005 मध्ये गडावर मोठी चेंगरा-चेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा चिरडून मृत्यू झाला होता.
संतप्त झालेल्या भाविकांनी पोलिसांसह जिल्हाधिकारी यांनाही मारहाण केली होती. या घटनेनंतर दुर्लक्षित असणाऱ्या गडावर प्रशासकीय यंत्रणेचं लक्ष गेलं आणि ही संपूर्ण यात्रा प्रशासनाने ताब्यात घेतली. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी एक समिती गठीत करण्यात आली. गडावरील सर्व सोई-सुविधा, भाविकांच्या अडचणी या समितीमार्फत पार पाडल्या जातात. तसेच ही यात्राही समितीच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. प्रशासकीय यंत्रणेने मांढरदेवी गडावरील अंधश्रध्दा संपुष्टात आणण्यासाठीही योग्य पावलं उचलली. त्यामुळे अनेक अनिष्ठ प्रथा व परंपरांना येथू हद्दपार झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; भाविकांना दर्शन घेता येणार नाही