(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाबळेश्वरमध्ये रपेट मारण्यासाठी घोड्यावर बसला, पण अचानक घोडा उधळला; पर्यटकासह घोडा दरीत कोसळला अन् पुढे...
महाबळेश्वरात प्रत्येक पाँईंटवर पर्यटकांना घोड्याची रपेट मारावीशी वाटते. लॉडवीक पाँईंटवर घोड्याची रपेट मारण्यासाठी एक गृप आला होता.
सातारा : महाबळेश्वरातील (Mahableshwar) महाराष्ट्रातील गजबजलेले पर्यटनस्थळ आहे. घोड्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता यावा अशी प्रत्येक पर्यटकाची इच्छा असते. लॉडविक पाँईंट येथे काल सायंकाळी धक्कादायक घटना घडली. घोड्यावरुन सैर करताना (Horse Riding) पर्यटकासह घोडा दरीत कोसळला. घोडा तीस फुटावर अडकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत घोडा आणि पर्यटक दोघेही जखमी झाले.
महाबळेश्वरात प्रत्येक पाँईंटवर पर्यटकांना घोड्याची सैर करावीशी वाटते. लॉडवीक पाँईंटवर घोड्याची सैर मारण्यासाठी एक गृप आला होता. एका घोड्यावर पर्यटक सैर करण्यासाठी बसला आणि घोडा उधळला. त्याचा वेग अचानक वाढला आणि तो दरीच्या टोकावर गेला. त्यावेळी घोड्याचा पाय घसरला आणि घोडा दरीत कोसळला. घटना पाहणाऱ्यांच्या सर्वांच्या अंगावर शहारे आले.सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर पर्यटक आणि घोडा दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
महाबळेश्वरमध्ये सर्वच हंगामात कायमच गर्दी असते. मात्र 2018 साली एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने घोड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता. घोडे व्यावसायिकांवर आलेल्या या बंदामुळे स्थानिक नेते आक्रमक झाले होते. त्यानंतर घोडे सवारी सुरू करण्यात आली आहे.
सुरक्षिततचे नियम धाब्यावर
महाबळेश्वर आणि पाचगणी येथे सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची फार मोठी गर्दी असते. घोड्यावरील सैर हे कायम मुख्य आकर्षण असते. घोड्यावरून पडून कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी हेल्मेट, नीपॅडसह अत्यावश्यक गोष्टी घोडे व्यावसायिकांनी पुरवणे आवश्यक असते. पण या गोष्टीकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. पर्यटकांच्या सुरक्षिततचे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र पाहायला मिळते. कालच्या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस अलर्ट झाले असून आता नववर्षाच्या स्वागातासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असेल त्यावेळी अनर्थ घडू नये यासाठी सूचना दिल्या जाणार आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील गजबजलेले पर्यटनस्थळ आहे. देशभरातून येथे फार मोठ्या संख्येने पर्यटक येतात. महाबळेश्वर परिसरातील पॉईंट हे दूर अंतरावर पसरलेले आहेत व ते सर्वच पॉईंट चालत पाहणे शक्य नसते. त्यामुळे काही अंतर वाहनाने व त्यापुढील जंगलातील सफर घोड्यावर बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद पर्यटक लुटतात.
हे ही वाचा :