(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सातारा : वाळू उपशासाठी पाळलेल्या गाढवांचा खटाव तालुक्यातील मायणीत उच्छाद; बालिकेच्या डोक्याला चावा घेत नेलं फरफटत, मालकावर गुन्हा दाखल
मायणीत चिमुकली दुकानाकडे खाऊ आणण्यासाठी निघाली असतानाच रस्त्यात उभ्या असलेल्या गाढवाने डोक्याला चावा घेत फरफटत नेले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तिची गाढवापासून सुटका केली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) खटाव तालुक्यातील मायणीमध्ये गाढवांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या डोक्याला चावा घेत गाढवाने फरफटत नेल्याची (donkey Bitten the girl head) घटना घडली. या घटनेत माहिरा मोहसीन मुजावर (वय 3, रा. मायणी, ता. खटाव) ही चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी कऱ्हाड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाढवाच्या तोंडाला मुसके न बांधता बाहेर सोडले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणताही काळजी न घेता गाढव सोडल्याने मालक राजेंद्र धोत्रेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाढवाच्या हल्ल्यात माहिरा रक्तबंबाळ
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मायणी येथील बसस्थानकाच्या मागे राहणारी माहिरा दुकानाकडे खाऊ आणण्यासाठी निघाली असतानाच रस्त्यात उभ्या असलेल्या गाढवाने डोक्याला चावा घेत फरफटत नेले. त्यावेळी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी तिची गाढवापासून सुटका केली. गाढवाच्या हल्ल्यात माहिरा रक्तबंबाळ झाली. मायणीत प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कराडमध्ये दाखल करण्यात आले.
वाळू उपसा करण्यासाठी आणलेल्या गाढवांचा उच्छाद
मायणी परिसरात मोठ्या प्रमाणात गाढवे आहेत. अनेकदा मालक गाढवांना रस्त्यावरच सोडून परगावी जातात आणि रस्त्यावर या गाढवांमुळे ग्रामस्थांना कायम त्रास सहन करावा लागतो. ग्रामंचायतीकडे अनेकदा तक्रारी येत असतात. परंतु, कोणतीही कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे भटकी कुत्री, गाढव, डुकरांसाठी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. आजपर्यंत एकही कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेली नाही.
कोल्हापुरातील गांधीनगरात गाढवाची दहशत
दुसरीकडे, कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गांधीनगरमध्येही असाच प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला होता. पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद सुरु असतानाच आता गाढवानेही सुद्धा दहशत सुरु केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गाढवाने केलेल्या हल्ल्यात दोन पुरुषांसह एक शाळकरी मुलगी जखमी झाली होती. गाढवाने धक्का देत रस्त्यावर पाडल्यानंतर वृद्धाच्या पायाचा चावा घेतला. दगड काठीने मारूनही गाढव बाजूला होत नसल्याने एका तरुणाने काठीने सलग दणके दिल्यानंतर रस्त्यावर धडक देऊन पाडलेल्या वृद्धाची सुटका झाली. गांधीनगर तसेच वळीवडे भागात भटक्या जनावरांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना आणि बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या