Sanjay Raut : फडणवीसांनी नॅनो शब्द वापरुन चूक केली, त्यांना दिल्लीश्वरांनी गुंगीचं औषध दिलेलं दिसतंय; संजय राऊतांचं प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कालच्या मोर्चावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं
Sanjay Raut On Devendra Fadnavis : महाविकास आघाडीच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मधल्या काळात फडणवीस हे दिल्लीला गेले होते. त्यावेळी दिल्लीश्वरांनी त्यांना गुंगीचं औषध दिलेलं दिसतंय, असा टोलाही राऊतांनी लगावला. आमचा मोर्चा नॅनो होता तर तुमचं सरकारही नॅनो बुद्धीचं असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीसांनी नॅनो शब्द वापरुन चूक केल्याचे राऊत म्हणाले.
कालचा मोर्चा हा सकराविरोधी नव्हता. हा मोर्चा हा महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात होता असेही राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल निघालेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला नॅनो मोर्चा असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. राऊत हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर टीका केली. कालचा मोर्चा हा नॅनो होती की दुसरा काय होता हे देशानं पाहिलं असल्याचे राऊत म्हणाले. कालच्या मोर्चाचं स्वागत फडणवीसांना करायला हवं होतं. त्यांनी मोर्चाला सामोरं जायला हवं होत असे राऊत म्हणाले.
आपलं राजकीय भविष्य अजून खूप मोठं होऊ शकतं
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची अवहेलना फार करुन घेऊ नये असेही राऊत म्हणाले. आपलं राजकीय भविष्य अजून खूप मोठं होणार आहे. होऊ शकतं आपल्याकडे क्षमता आहे. पण गेल्या 70 वर्षात ज्यांनी-ज्यांनी महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली ते राजकारणातून पाचोळ्यासारखे उडून गेल्याचे राऊत म्हणाले. कालच्या मोर्चानं दोन गोष्टी दाखवल्या आहेत. जरी केंद्राने राज्यपालांना माघारी बोलावलं नसलं तर कालच्या मोर्चानं राज्यपालांना नाकारलं आहे. हीच जनता उद्या सरकारला नाकारल्याशिवाय राहणार नसल्याचे राऊत म्हणाले.
मनात आणि मनगटात असणारी शिवसेना कशी काढणार?
कालच्या मोर्चाला सर्वच पक्षाले लोक आहे होते. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवण्याचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनात आणि मनगटात जी शिवसेना आहे ती तुम्ही कशी काढणार? असा सवाल राऊतांनी केला. विरोधकांच्या आंदोलनाचा सन्मान करणं ही लोकशाहीची पहिली पायरी आहे. कालच्या आमच्या मोर्चाला जर कोणी नॅनो मोर्चा म्हणत असेल तर राजकारणात एवढी तुमची वर्ष वाया गेल्याचा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
उदयनराजे भोसले यांच्याशी माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे
उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेचं पहिलं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. त्यांच्या डोळ्यातून ज्यावेळी अश्रू आले त्यावेळी मी सांगितलं की त्यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू असल्याचे राऊत म्हणाले. छत्रपती शिवराय यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात महाराष्ट्रातील जनतेत संताप असल्याचं राऊत म्हणाले. उदयनराजे यांनी त्यांनी लढत राहिलं पाहिजे, बोलत राहिल पाहिजे असेही राऊत म्हणाले. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला मान अभिमान आहे. उदयनराजे भोसले यांच्याशी माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याचे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले...