Satara News : सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्ववत; पुसेसावळी तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक
Satara News : नेट बंद असल्याने सर्वात मोठा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.
सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये रविवारी झालेल्या दोन गटामधील तणावानंतर अजूनही परिस्थिती तणावाखाली आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी गावामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवारी झालेल्या तणाव प्रकरणात आतापर्यंत 34 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडित करण्यात आलेली इंटरनेट सेवा पुन्हा टप्प्याटप्याने आज सकाळपर्यंत पूर्ववत झाली आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर तांत्रिक पुराव्यांवर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, काही लोकांकडून पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत बाजारपेठ उघडण्यास विरोध केला आहे. जोपर्यंत युवकांना या गुन्ह्यातून वगळले जात नाही, तोपर्यंत बाजारपेठ सुरू होणार नसल्याची भूमिका संबंधितांनी घेतली आहे. त्यामुळे गावात शांतता असली तरी बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
दरम्यान, नेट बंद असल्याने सर्वात मोठा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. इंटरनेट बंदीने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. पर्यटन व्यवसाय पूर्णपणे कोलमडला. नेट बंद झाल्याने पाचगणी महाबळेश्वर येथून अनेक पर्यटक परत फिरले. इंटरनेट सेवा प्रशासनाकडून पूर्ववत करण्यात आली असली तरी जमाव बंदी आदेश अद्याप हटवण्यात आलेला नाही.
आतापर्यंत 34 जणांना अटक
दरम्यान, पुसेसावळी तणाव प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 34 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील 15 जणांना वडूज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 16 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, बाजारपेठ सुरू करण्यासाठी पोलिसांनी गावातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची मुलं अटकेत असल्याने आम्ही दुकाने कशी सुरू, अशी विचारणा व्यापाऱ्यांनी केली. अटकेतील मुलांचा दंगलीशी संबंध नसल्याचा दावाही केला. मात्र, पोलिसांनी ठोस पुरावे हाती आल्यानंतर कारवाई केल्याचे सांगितले. तसेच पुसेसावळीत दंगल झाली होती तेव्हा आपली मुलं कुठं होती याचा माहिती सादर करा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पुसेसावळीत तणाव कसा निर्माण झाला?
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या