Satara News : ज्या गावात दोन समाजांनी बंधुभावाने पारायण सोहळा केला तिथेच दंगलीचा डाग लागला; साताऱ्यात आतापर्यंत काय घडलं?
Satara : पुसेसावळीत एक महिन्यांपूर्वीच दोन समाजांनी एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र पारायण सोहळा आयोजित केला होता. त्याच सातारमधील पुसेसावळीत दंगलीने भयकंप झाला आहे.
सातारा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या आणि अखंड भारतात देदीप्यमान परंपरा असलेल्या साताऱ्यामध्ये जातीय दंगलीचा डाग लागला आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यामध्ये एका तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. जातीय तणाव निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा सोशल मीडिया कारणीभूत ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज (13 सप्टेंबर) इंटरनेट बंदी करण्यात आली आहे.
पुसेसावळीत एक महिन्यांपूर्वीच दोन समाजांनी एकत्र गुण्यागोविंदाने एकत्र पारायण सोहळा आयोजित केला होता. त्याच साताऱ्यामधील पुसेसावळीत दंगलीने भयकंप झाला आहे. गावातील जाळपोळ पाहून गावकरी सुद्धा मुळापासून हादरुन गेले आहेत. सातारा शहर आणि जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात इंटरनेट बंदी असल्याने बँकिंग व्यवहार तसेच अनेक कार्यालयांचे व्यवहार ठप्प आहेत. शाळा महाविद्यालय सुरू असली तरी पालकांनी आपल्या जबाबदारी वर विद्यार्थ्यांना सोडावे आणि आणावे असे आवाहन शाळांच्या वतीने देखील करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आहे.
सर्वधर्मीयांकडून सातारमध्ये मूक मोर्चा
दरम्यान, दंगलीचा डाग लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये शांततेसाठी सर्वधर्मीयांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवला होता. या मोर्चामध्ये सर्व धर्मियांचे लोक सहभागी झाले. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण न करता सर्वांनी सामोपचाराने राहण्याचे आवाहन यावेळी सर्वधर्मियांकडून करण्यात आले.
पोलिसांकडून 23 जणांना अटक
दरम्यान, पुसेसावळीमध्ये झालेल्या जातीय तणावानंतर सातारा पोलिसांकडून आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणाचा तपास सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. सोशल मिडियावर पोस्ट करणाऱ्याला तरूणाही ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मृत तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
दरम्यान, जातीय तणावात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचा मृतदेह 13 तासांनी नातेवाईकांनी ताब्यात घेतला. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केल्याचे सांगत अन्य आरोपींना सुद्धा अटक केली जाणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यामुळे सिव्हिल रुग्णालयासमोर तणावाची परिस्थिती होती.
नेमका प्रसंग काय घडला?
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या