Koyna Dam : कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग
कोयना धरणात एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे. धरण 80.97 टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत.
Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे. धरण आतापर्यंत 80.97 टक्के भरले आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले आहेत.
त्यामुळे 8 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे. काल दुपारी पायथा वीजगृहातून कोयना नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने कोयना नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू असल्याने जलाशयात प्रतिसेकंद 55 हजार 447 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या 24 तासांत कोयनानगरला सर्वांत जास्त 208 मिलिमीटर, नवजाला 115 आणि महाबळेश्वरला 174 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना जलाशयाचा साठा त्यामुळे 4.76 टीएमसीने वाढला. सलग तीन दिवस सरासरी पाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरण 80 टक्के भरले आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयनानगरमध्ये तीन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. धरणात काल पावणेपाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली.