(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sarla Ek Koti : अभिमानास्पद! 'सरला एक कोटी' सिनेमाची प्रेक्षकावर भुरळ; भारावला अन् लेकीचं नाव ठेवलं...
Sarla Ek Koti : 'सरला एक कोटी' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Sarla Ek Koti Marathi Movie : मराठी मनोरंजनसृष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत सामाजिक गोष्टींकडेदेखील लक्ष ठेवते. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हे सिनेमे मनोरंजनासोबत प्रबोधनदेखील करत आहेत. आता 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा सिनेमा पाहून एक प्रेक्षक भारावला आणि त्याने आपल्या लेकीचं नाव थेट 'सरला' असं ठेवलं आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील अशोक तपासे यांच्या घरी नुकतचं छोट्या चिमुकलीचं आगमन झालं आहे. अशातच ते 'सरला एक कोटी' हा सिनेमा पाहायला गेले. या सिनेमाने ते भारावून गेले आहेत. या सिनेमातील नायिकेचं नाव 'सरला' असं आहे. आता या भारावलेल्या प्रेक्षकाने सिनेमातील नायिकेच्या नावावरुन आपल्या लेकीचं नावदेखील 'सरला' असं ठेवलं आहे.
'सरला एक कोटी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नितीन सुपेकरने सांभाळली आहे. या सिनेमाला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल नितीन म्हणाला,"सिनेमातील नायिकेच्या नावावरुन आपल्या लेकीचं नाव ठेवणं ही सिनेमाच्या टीमसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. 'सरला एक कोटी' या सिनेमाने आणखी एक सरला जन्माला घातली आहे. अतिशय आनंददायी अशी ही घटना आहे".
दमदार स्टारकास्ट असलेला 'सरला एक कोटी' (Sarla Ek Koti Star Cast)
'सरला एक कोटी' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच दमदार आहे. या सिनेमात ईशा केसकर (Isha Keskar), ओंकार भोजने (Onkar Bhojane), छाया कदम (Chhaya kadam) महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 20 जानेवारीला प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा नितीन सुपेकरने सांभाळली आहे.
'सरला एक कोटी' प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात यशस्वी; पण...
'सरला एक कोटी' या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. सध्या 'पठाण', 'वेड' आणि 'वाळवी' या सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. हे सिनेमे प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. त्यामुळे 'सरला एक कोटी' या सिनेमाचे शो कमी करण्यात आले आहेत. याचा निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.
संबंधित बातम्या