Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: आसरा न मिळताच लघवीला पळाला, मिशीही कापली; सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेने भिवंडीत काय काय केलं?
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी सुदर्शन घुले मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत आला होता.
Santosh Deshmukh Murder Case Sudharshan Ghule: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) यांच्याकडून नवी माहिती उघड झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने (Walmik Karad) 31 डिसेंबर रोजी सीआयडीला सरेंडर केलं होतं. त्यानंतर अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला शुक्रवारी (03 जानेवारी) ताब्यात घेण्यात आले. यानंतर सदर प्रकरणातील विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी सुदर्शन घुले मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडीत आला. भिवंडीत आल्यानंतर त्यांनी सामाजिक संस्था चालवणारे सोन्या पाटील यांचे कार्यालय गाठले. त्यानंतर त्या कार्यालयावर सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांना प्रथम भेटले. यावेळी त्यांनी गावाच्या शेजारी राहणारे विक्रम डोईफोडे बारचे मालक आहेत यांच्याबद्दल विचारणा केली. कारण सुदर्शन घुले यांना माहीत होते की सोन्या पाटील यांच्या संस्थेत विक्रम डोईफोडे काम करतात. तसेच सुदर्शन घुले यांच्या गावचा मुलगा विक्रम डोईफोडेकडे काम करत होता. त्यामुळे त्यांनी सोन्या पाटील यांच्या कार्यालयावर चौकशी केली. परंतु सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांनी ही माहिती विक्रम डोईफोडेंना दिली आणि त्यानंतर डोईफोडे यांचा पत्ता मिळाल्यानंतर सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार वळ पाडा येथील बारवर पोहोचले व एक-दोन दिवस लपण्यासाठी मदत मागितली. परंतु त्या ठिकाणी विक्रम डोईफोडे हे बाहेर होते आणि कामगारांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट मनाई केली त्यानंतर हे तिन्ही आरोपी तेथून निघून गेले आणि गुजरातला पोहचले, अशी माहिती समोर आली आहे.
आपली ओळख लपवण्यासाठी मिशी कापली-
वळपाडा येथील डोईफोडे यांच्या हॉटेलवर आसरा न मिळाल्याने लघवीला जातो असं सांगून सुदर्शन घुलेनं तिथून पलायन केलं. त्यानंतर तिघेही गुजरातला गेल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये एका मंदिरात त्यांनी जळपास 15 दिवस आसरा घेतला होता. आरोपी सुदर्शन घुले यानं आपली ओळख लपवण्यासाठी मिशी कापल्याची देखील माहिती समोर आली आहे. भिवंडीत आल्यानंतर त्याने मिशी कापली होती. याबाबतचा फोटो देखील समोर आला आहे.
आरोपी माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत-
सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना अटक झाल्यानंतर केज न्यायालयात हजर केले गेले. यानंतर केज न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांची चौकशी झाल्यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत या तिघांची रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी गेवराई पोलीस ठाण्यात आहेत. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.