Suresh Dhas: वाल्मिक कराडने मसल पॉवरसोबत माईंड पॉवरही वापरली, 100 बँक अकाऊंट सापडली, सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
Suresh Dhas On Walmik Karad: सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केले.
Suresh Dhas On Walmik Karad: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काल पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर काही खळबळजनक आरोप केले.
वाल्मिक कराडचे 100 अकाऊंट सापडले आहेत. एरवी 50 पेक्षा जास्त अकाऊंट असतील तर लगेच ईडी चौकशी लागते. परंतु वाल्मिक कराडविरोधात कारवाई झालेली नाही, असा आरोपही सुरेश धस यांनी केला. वाल्मिक अण्णा उर्फ आका 17 मोबाईल नंबर वापरतात. वालुकाका अँड गॅंग गँग्स ऑफ परळी यांच्यामुळे पुण्याचं नाव खराब होईल. त्यामुळे जिथे जिथे यांचे पुण्यात फ्लॅट्स असतील, यांची प्रॉपर्टी दिसेल, त्यावेळी मला फक्त कळवा, असं आवाहन देखील सुरेश धस यांनी केले.
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक-
पवनचक्की कंपनीकडून खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्याच बंगल्यावर झाली. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांनी हत्या झाली आहे, असा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. परळीत 14 जून रोजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवनचक्की यांच्या मॅनेजरसोबत आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत बैठक झाली. नितीन भिक्कड हा देखील उपस्थीत होता. धनंजय मुंडे यांचा जोशी नावाचा पीए आहे कंपनीचे वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधत धनंजय मुंडे यांचा संपर्क होतो का पाहत होतो. त्यावेळी वाल्मिक कराडची सटकली. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर मुंबईत या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत 3 कोटी रुपयाला डील फायनल झाली, असा दावा सुरेश धस यांनी केला.
सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत विधाने टाळायला हवी- प्रवीण दरेकर
एकमेकांवर टीका करणे योग्य नाही. सुरेश धस यांनी अजित पवारांबाबत अशा प्रकारची विधाने करणे टाळायला हवे होते, असं मत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस यांना योग्य तो संदेश दिला आहे. एसआयटी ही मोठी तपास यंत्रणा आहे. जर सुरेश धस यांना काही महत्त्वाची आर्थिक माहिती मिळाली असेल, तर त्यांनी ती एसआयटीकडे सुपूर्द करायला हवी. जेव्हा एसआयटी स्थापन केली गेली, तेव्हा वाल्मीक कराड आणि पोलिसांच्या संबंधांची कोणतीही माहिती नव्हती, असं प्रवीण दरेकरांनी सांगितलं.