फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज आपला पक्ष शोधतायत; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
उद्धव ठाकरे आपला पक्ष कुठे आहे हे शोधत बसलेत, तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहत आहात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. बेईमानी करणाऱ्यांचा बदला हा काळच घेत असतो. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्याच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांना मात्र आज घरी बसवलं आहे, उद्धव ठाकरे आपला पक्ष कुठे आहे हे शोधत बसलेत, तर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची काय परिस्थिती आहे तुम्ही पाहत आहात, अशी टीका त्यांनी केली.
लोकसभा मतदारसंघ निवडणूक तयारीच्या महाविजय 2024 च्या दौऱ्याच्या अनुषंगाने बावनकुळे तासगाव दौऱ्यावर असताना बोलत होते. 2024 च्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजप विरोधात इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. या आघाडीतून त्यांचा पंतप्रधान करणार आहेत आणि हिंदू संस्कृती संपवण्याचा काम हे करणार आहेत, हे आपणाला मान्य आहे का? शरद पवार यांनी हिंदू संस्कृती संपवणाऱ्यांबरोबर युती केली आहे अशीही टीका बावनकुळे यांनी केली.
जनतेला विचारलं की 2024 ला पंतप्रधान कोण पाहिजे सर्वांनी नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. एकानेही राहुल गांधी यांचं नाव घेतलं नाही. 9 वर्षात मोदी साहेबांनी मोठी कामे केली आहेत. कोरोनाच्या काळात मोदी साहेबांनी लस उपलब्ध करून दिली आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या आधी इंग्रजांनी सुद्धा चंद्रावर झेंडा फडकला नव्हता. मात्र, नरेंद्र मोदी साहेबांनी चंद्रावर झेंडा फडकवला. नरेंद्र मोदी यांनी देशाचा मान सन्मान वाढवला आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच
शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी व आपले लोक बांधून ठेवायचे आहेत, असा चिमटाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. ते सांगली लोकसभा प्रवासात कराड येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे. कुटुंब किंवा आघाडीमध्ये मोठ्या भावाने एक पाऊल मागे घेणे ही पूर्वीपासून भाजपची भूमिका आहे, त्यात वावगे काहीच नाही. सरकारमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधींची कामे आता होत आहेत. लवकरच राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, असे झाले तर 14-15 मंत्री वाढतील आणि पालकमंत्री देखील वाढतील, सरकारी कामे व योजनांना गती मिळेल.