Sangli Crime : घरफोडीत तरबेज असलेल्या तीन अट्टल चोरट्यांना विटा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
विटा पोलिसांनी तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून सातारा, विटा, तासगावमध्ये केलेल्या अनेक घरफोड्या उघडकीस आणल्या. या चोरट्यांकडून पावणे दहा लाखांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला.
Sangli Crime : विटा पोलिसांनी तीन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून सातारा, विटा, तासगावमध्ये केलेल्या अनेक घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. जवळपास चार घरफोड्या उघडकीस आणत या चोरट्यांकडून पावणे दहा लाखांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप याचा समावेश आहे.
या चोरट्यांनी सांगली जिल्ह्यातील विटा, तासगाव आणि सातारा जिल्ह्यातील उंब्रज व औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या केल्या होत्या. प्रतीक ऊर्फ नयन शंकर जाधव (वय 21, रा. वाघेश्वर, पो, मसूर, ता. कऱ्हाड), होती. गौतम प्रकाश माळी (वय 21, रा. मायणी, ता. खटाव) व अनिकेत अधिकराव गायकवाड (वय 22, रा. निहीरवाडी-रहिमतपूर, ता. कोरेगाव)प्रतीक जाधव, गौतम माळी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
या चोरट्यांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, जीप यासह 9 लाख 72 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विटा येथे राहणारे संदीप शितोळे यांच्या घरात दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी मध्यरात्री घरफोडी करून या तिघांनी मौल्यवान वस्तूसह इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले होते.
याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या घरफोडीतील संशयित गौतम माळी आणि प्रतीक ऊर्फ नयन जाधव हे चोरटे कडेगाव येथील औद्योगिक वसाहतीत भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम व निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकून त्या दोघांनाही अटक केली.
चौकशीत त्यांनी साथीदार अनिकेत गायकवाड याच्या मदतीने औध, उंब्रज, विटा व तासगाव हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यासाठी वापरलेल्या जीपसह सोने-चांदीचे दागिने व इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, असा सुमारे 9 लाख 72 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांनाही अटक केली. ही घरफोडी करणारी टोळी सापडल्याने घरफोडीच्या आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या