Sangli: सांगलीत महाविद्यालयाने आश्वासन देऊनही 25 टक्के शैक्षणिक शुल्क परत केलं नाही, संतप्त विद्यार्थ्यांचे आंदोलन
Sangli: सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना फी परत दिली नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या मारून आंदोलन करण्यात आले.

Sangli: सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात (walchand college of engineering, sangli) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना फी परत दिली नसल्याच्या निषेधार्थ ठिय्या मारून आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची शासनाने 25% फी परत देण्याचे आदेश दिले होते, मात्र वालचंद महाविद्यालय प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून अद्यापही विद्यार्थ्यांना फी परत दिली नाही. यामुळे आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने वालचंद महाविद्यालयाच्या (walchand college of engineering, sangli) विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले.
महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये हे अभियांत्रिकी विद्यार्थी आता धरणे आंदोलनावर बसले होते. जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचे 16,500 प्रमाणे परत देण्याची फी थकवण्यात आली आहे. फी परत देण्यामध्ये महाविद्यालय प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत ही 25 टक्के फी शासनाने दिलेल्या निर्णयानुसार परत देण्यात येत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. शेवटी वालचंद महाविद्यालयाने 25 टक्के शैक्षणिक शुल्क मार्च अखेर परत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.
कोरोना काळात सोयीसुविधा घेता न आल्याने वालचंद महाविद्यालयाने 25 टक्के शैक्षणिक शुल्क मार्च अखेर परत करण्याचे आश्वासन मंगळवारी अभाविपच्या या आंदोलनानंतर दिले. यामुळे सुमारे पाऊणेदोन कोटी रुपये विद्यार्थ्यांना परत मिळणार आहेत. कोरोना महामारीमुळे 2 वर्ष महाविद्यालय हे बंद होते. महाविद्यालयातील कुठल्याही सोयी सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना घेता न आल्याने तत्कालीन सरकारने अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या निर्देशानुसार शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शुल्कामध्ये 16 हजार 250 रुपये सवलत देणे हे क्रमप्राप्त होते. परंतु वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही सवलत विद्यार्थ्यांना दिली नाही. याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार महाविद्यालयाला निवेदन दिले. उपसंचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालयाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अभाविपने मंगळवारी महाविद्यालय बंद आंदोलन केले. यावेळी महाविद्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुमारे साडेतीन तास विद्यार्थ्यांनी आंदोलन करीत ठिय्या केला. उपसंचालक महाविद्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीवर विद्यार्थ्यांकडून दगड ठेऊन निषेध करण्यात आला.
दरम्यान, 31 मार्चपर्यंत खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे 16,250/- प्रत्येकी, इतर मागास वर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे 10,000/- (एकूण शुल्काच्या 25%) एवढे शुल्क विद्यार्थ्यांना परत करून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतले. एकूण 1560 विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थी वगळता इतर सर्व विद्यार्थ्यांना 1 कोटी 73 लाख 55 हजार महाविद्यालय परत करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
