(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : पालकांना शोधत गॅलरीत गेली आणि तोल जाऊन पडली, मिरजेत चार वर्षांच्या चिमुकलीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू
Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरजेमधील झारीबाग इथे अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरजमध्ये (Miraj) हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मिरजेमधील झारीबाग इथे अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यशवी निलेश देशमाने असं मृत बालिकेचं नाव आहे. घरात कोणीही नसताना ही दुर्घटना घडली. पालकांकडून अनावधनाने झालेल्या चुकीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मिरजेत देशमाने कुटुंब हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात. निलेश देशमाने हे क्ष-किरण तज्ज्ञ आहेत. देशमाने यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी आजारी असल्याने सोमवारी (6 फेब्रुवारी) रात्री तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. परंतु यावेळी लहान मुलगी यशवी झोपली होती. त्यामुळे देशमाने कुटुंबीय घराला कुलूप लावून डॉक्टरकडे गेले. मात्र, गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करण्यास विसरले.
थोड्या वेळात जागी झालेली यशवी पालकांचा शोध घेत गॅलरीत गेली. झोपेत असल्याने गॅलरीतून तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मंगळवारी (7 फेब्रुवारी) पहाटे तिचा मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्युची नोंद झाली आहे. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होत आहे.
वसईत मागील वर्षी अशीच घटना
अशाच प्रकारची घटना मागील वर्षी जुलै महिन्यात मुंबईजवळच्या वसईमध्ये घडली होती. गॅलरीतून वाकून बघताना तोल गेल्याने सातव्या मजल्यावरुन पडून साडेतीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. वसईच्या अग्रवाल टाऊनशीप या हाय प्रोफाईल सोसायटीतील रिजन्सी सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली होती. मृत मुलीची आई तिच्या मोठ्या मुलीला सोडण्यासाठी शाळेत गेली होती. त्यामुळे मुलगी घरी एकटी झोपली होती. थोड्या वेळाने मुलीला जाग आल्यानंतर मुलगी गॅलरीत मोबाईल घेऊन खेळायला गेली अन् दुर्घटना घडली. श्रेया महाजन असं मृत झालेल्या साडे तीन वर्षांच्या चिमुकलीचं नाव होतं.
कुटुंबियांनी मुलांना घरात एकटे सोडताना काळजी घ्यावी : पोलीस
पालकांकडून अनावधनाने झालेल्या चुकीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. मोठ्या मुलीला डॉक्टरांकडे नेण्याच्या गडबडती ते गॅलरीचा दरवाजा बंद करण्यास विसरले आणि तिथेच घात झाला. दरम्यान, कुटुंबियांनी आपल्या मुलांना घरात एकटे सोडताना पूर्ण काळजी घ्यावी अन्यथा शेजाऱ्यांना सांगून जावे, ज्यामुळे अशा घटना घडणार नाहीत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा