Sangli News : सांगलीत कुत्र्यांचा हैदोस, शेळीसह घोडाही ठार, पालिकेत कुत्री सोडण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
Sangli Dogs Attack : सांगली शहरातील बऱ्याच भागाच भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून महापालिकेकडून योग्य उपाययोजना होत नसल्याने नागरिक अत्यंत संतंप्त झाले आहेत.
Sangli News Update : सांगली शहरात (Sangli City) सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी सर्वांना त्रासून सोडलं आहे. सांगलीत जिकडे जाईल तिकडे टोळीने भटकी कुत्री (Dogs) फिरताना दिसत आहेत. ही भटकी कुत्री माणसांसोबत इतर मुक्या जनांवरावरही हल्ला करताना दिसत आहेत. शेळी, घोड्यासारख्या प्राण्यांवर कुत्र्यांनी हल्ला केला असून त्यात त्यांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे सांगली, मिरज , कुपवाड या मनपा क्षेत्रात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ही कुत्री महापालिकेत सोडू, असा इशाराही नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिलाय.
सांगली शहरातील बऱ्याच ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मुजावर प्लॉटमध्येतर सुमारे 20 ते 25 मोकाट कुत्र्यांनी शेळी आणि घोड्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घातला. कुत्र्यांकडून नागरिक, महिला, लहान मुलांवर हल्ले सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाचाही कुत्र्यांनी चावा घेतला होता. काही दिवसांपूर्वीच पंचशीलनगरमध्ये एका लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला. या मुलावर उपचारासाठी दीड लाख रुपये खर्च आला. त्याच्या कुटुंबाने कर्ज काढून उपचार केल्याचे प्रकरण स्थायी समितीत चांगलेच गाजले होते.
...अन्यथा महापालिकेत कुत्री सोडू
मंगळवारी आता 20 ते 25 कुत्र्यांनी मुजावर प्लाॅटमध्ये शेळी आणि घोड्यावर हल्ला केला. या घटनेने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेबाबत नागरिकांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी तातडीने वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही अधिकारी घटनास्थळी आले. यावेळी नागरिकांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. महापालिकेने आठ दिवसांत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास कुत्री महापालिकेत सोडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय.
हे ही वाचा