Chandrahar Patil on Loksabha Election : सांगली लोकसभेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी शड्डू ठोकला! म्हणाले, मला लोकसभा लढवण्यासाठी....
मला सांगली लोकसभा लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून ऑफर आली आहे. मी सुद्धा लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. जिल्ह्यातील अनेकांनी मी लोकसभा लढ्वावी अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.
सांगली : सांगली (Sangli) लोकसभेला (Sangli Loksabha Election) चुरस आणखी वाढली असून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil on Loksabha Election) यांनी सांगली लोकसभेसाठी शड्डू ठोकला आहे. त्यांनी स्वत: लोकसभेसाठी तयारी करत असल्याचे सांगताना सांगली लोकसभा जागेवर शड्डू ठोकला आहे.
लोकसभा लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून ऑफर
चंद्रहार पाटील यांनी सांगितले की, मला सांगली लोकसभा लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून ऑफर आली आहे. मी सुद्धा लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. जिल्ह्यातील अनेकांनी मी लोकसभा लढ्वावी अशी इच्छा व्यक्त केली आहे, मी सुद्धा लोकसभा लढण्यास तयार आहे. त्यामुळे सांगलीत आता चुरशीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, चंद्रहार पाटील यांनी रक्तदानसाठी पुन्हा एकदा मोठी मोहिम आखली आहे. 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आर्मी हॉस्पिटलसाठी 1 हजार युवक दिल्लीला रक्तदानासाठी जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
चंद्रहार पाटील सातत्याने ग्रामीण भागात नाळ जोडत चर्चेत
चंद्रहार पाटील यांनी सातत्याने ग्रामीण भागात नाळ जोडत चर्चेत राहिले आहेत. बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एक लाख बाटल्या रक्तसंकलनाची सामाजिक जबाबदारी अंगावर घेतली असून या निमित्ताने गाव पातळीवर रक्तदान चळवळ सुरू केली आहे. यापुर्वी 2007 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे.
सांगलीत लढत तिरंगी होणार का?
विट्यामधील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकल्याने आता सांगलीत तिरंगी लढत होणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सांगलीच्या मैदानात आणखी एका पाटलांची एन्ट्री झाली आहे. भाजप खासदार संजयकाका पाटील सध्या सांगलीचे प्रतिनिधीत्व करत आहेत. भाजप माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही खासदारकीच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्यांनी अलीकडेच आमदार सुमनताई पाटील यांच्या व्यासपीठावर हजेरी लावत संजयकाका पाटील यांना डिवचले होते. दुसरीकडे, काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही पुन्हा तयारी सुरु केली असून त्यांनी संजयकाका पाटील यांना संधी मिळेल तेव्हा हल्लाबोल केला आहे. माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या