(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑन ड्युटी मोबाईलवर बोलल्याने एसटी चालकावर निलंबनाची कारवाई, आटपाडीतील घटना
Sangli News : आटपाडीत ऑन ड्युटी मोबाईलवर बोलल्याने एका एसटी कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे.
Sangli News : आटपाडी (Atpadi) आगारातील चालक (ST Employee) विलास मारुती कदम यांच्यावर ऑन ड्युटी मोबाईलवर बोलल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 12 मार्च रोजी आटपाडी ते इचलकरंजी या मार्गावर बस (ST Bus) चालवत असताना कदम हे मोबाईलवर बोलत असल्याचा एक व्हिडीओ (Video) समोर आला. त्यानुसार सांगलीच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी कदम यांच्यावर चौकशीसाठी निलंबनाची कारवाई केलीय.
तत्पूर्वी बस चालवत असताना आजारी पत्नीशी बोलत असल्याचा विलास कदम यांनी दावा केलाय. दोन दिवसांपूर्वीच विलास कदम यांच्या पत्नीने नवऱ्याला रजा द्या म्हणून आटपाडी डेपोत ठिय्या मांडत आंदोलन केले होते. निलंबित (St Bus Employees Suspension ) मुदतीत विलास मारूती कदम यांनी आटपाडी आगार व्यवस्थापकाकडे साप्ताहिक सुट्टी सोडून दररोज सकाळी 10.00 वाजता हजेरी देऊन कार्यालयीन वेळेपर्यत हजर राहतील, तसेच त्यांना आटपाडी आगार यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही, असेही आदेश निलंबनाच्या पत्रात देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आटपाडी येथील एसटी आगारामध्ये विलास कदम एसटी चालका म्हणून गेल्या 33 वर्ष पासून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी आजारी असल्याने त्यांनी 12 व 13 मार्च रोजी सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र तो अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर विलास कदम हे ड्युटीवर निघून गेले. मात्र पतीला सुट्टी देत नसल्याच्या कारणातून चालक कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आटपाडी एसटी आगार प्रमुखांच्या केबिन समोर झोपून आंदोलन केलं होतं. या घटनेमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. मग एसटी प्रशासनाकडून संबंधित महिलेच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आता एसटी प्रशासनाकडून थेट एसटी चालक कदम यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
विलास कदम यांना सेवेतून तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलल्याचा ठपका ठेवत एसटी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कदम यांनी रोज सकाळी दहा वाजता एसटी आगारात येऊन हजेरी लावून कार्यालयीन वेळेत एसटी आगार प्रमुखाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, विलास कदम यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही प्रशासनाच्या सूडबुद्धीतून झाली असून प्रशासनाच्या या अन्याय आणि मनमानी भूमिकेचा विभागातील सर्व कामगार वर्गातून निषेध होत आहे. कामगारांमध्ये असंतोष पसरलेला असून मनमानी कारवाई मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विभागातील कामगार प्रतिनिधींनी याप्रसंगी दिला आहे.
संबंधित बातमी:
Sangli News : नवऱ्याला रजा द्या, बायकोचा आटपाडी एसटी डेपोत ठिय्या, आंदोलनानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
Sangli News : एसटी ड्रायव्हर पतीच्या सुट्टीसाठी आगारात झोपून आंदोलन करणाऱ्या पत्नीवर गुन्हा दाखल!