Sangli Mass Murder case : म्हैसाळ सामूहिक हत्याकांड; आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानसह चौघांविरुद्ध चार्जशीट दाखल
म्हैसाळ गावातील एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषारी औषध देऊन त्यांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानसह चौघांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
Sangli Mass Murder case : मिरज तालुक्यामधील म्हैसाळ गावातील एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषारी औषध देऊन त्यांच्या सामूहिक हत्याकांडप्रकरणी प्रमुख आरोपी मांत्रिक अब्बास मोहम्मद अली बागवानसह चौघांविरुद्ध सांगली सत्र न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
म्हैसाळ येथील शिक्षक पोपट वनमोरे, त्यांचा भाऊ पशुवैद्यकीय डॉ. माणिक वनमोरे या दोघा भावांसह त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांना जून महिन्यात विषारी औषध देऊन त्यांची सामूहिक हत्या करण्यात आली होती. गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास यास मोठी रक्कम दिली होती. मात्र, गुप्तधन मिळाले नसल्याने यासाठी घेतलेली रक्कम परत देण्यासाठी वनमोरे यांनी मांत्रिक अब्बास याला तगादा लावला होता.
यामुळे अब्बास याने वनमोरे कुटुंबीयांना काळ्या चहातून विषारी गोळ्या देऊन नऊ जणांची हत्या केली होती. मांत्रिकाने हे हत्याकांड घडवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने सोलापुरातून मांत्रिक अब्बास मोहम्मदअली बागवान, त्याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवसे, मनोज क्षीरसागर व त्याचे आर्थिक व्यवहार पाहणारी मांत्रिकाची बहीण जैतूनबी मोहम्मद अली बागवान या चौघांना पोलिसांनी अटक केली होती.
याशिवाय म्हैसाळ, विजयनगरसह परिसरातील 25 हून अधिक सावकारांवर गुन्हा दाखल करून त्यांनाही अटक करण्यात आली होती. वनमोरे कुटुंबाच्या हत्याकांड प्रकरणाचा तपास करून पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
लाईट बंद करून काळ्या चहातून विष दिले
म्हैसाळमधील डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. त्यांच्या संपर्कात सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान हा होता. ‘गुप्तधन शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यावेळी मांत्रिकाने या कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले.
19 जूनची तारीख वनमोरे यांना दिली होती. त्यानुसार मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे त्या दिवशी सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दांपत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली. लाईट बंद केल्यानंतर त्याने सर्वांना काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आले. मागील तीन ते चार वर्षांपासून हे वनमोरे बंधू या मंत्रिकाच्या संपर्कात होते. 19 जून रोजी आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होते.
आधी शिक्षक असललेल्या पोपट वनमोरे, त्यांच्या पत्नी, मुलगी यांना हा काळा चहा दिला. त्यानंतर पोपट यांचा मुलगा शुभमला घेऊन पशु डॉक्टर असलेल्या माणिक वनमोरेच्या घरी आले. तिथे माणिक वनमोरे, त्यांची आई, पत्नी, दोन्ही मुले आणि शुभमला चहा देण्यात आला. रात्रभर हा कट यशस्वी केल्यानंतर हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले.
इतर महत्वाच्या बातम्या