Sangli Crime News: आटपाडीत अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपानं वातावरण तापलं; पोलीस म्हणाले दबाव नाही तर...
Sangli Crime News: या प्रकरणात गुन्ह्यातून आरोपी सोडण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यातील संवादाचे सखोल चौकशीचे एसपींनी आदेश दिले आहेत.

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणीमधील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या तपासामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं आहे. या प्रकरणात गुन्ह्यातून आरोपी सोडण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यातील संवादाचे सखोल चौकशीचे एसपींनी आदेश दिले आहेत.
पोलिसांनी काय म्हटलंय?
आटपाडी तालुक्यातील करगणीतील अल्पवयीन मुलीच्या आत्महत्याप्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचे आरोप केल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे म्हटलं आहे. दरम्यान, याच केसबाबत एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्यात एका व्यक्तीने पोलिसांच्या नावाने गुन्ह्यातून आरोपी सोडण्यासाठी पैशाची मागणी केली असल्याचे आढळून येत आहे. याची दखल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून, याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास विटा पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांच्यामार्फत सुरू आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 107,3(5), 64(2) (एम), 74, 78 तसेच पोक्सो कायदा कलम 4, 6, 8 अंतर्गत गुन्हा दाखल असून, आरोपींच्या मोबाईल फोनसह डीव्हीआर मशीन जप्त करण्यात आले आहे. सर्व पुरावे न्याय वैज्ञकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
आटपाडी तालुक्यातील करगणी गावात एका दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येमागे शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप केला जात आहे. शारिरीक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्यानेच त्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी करगणी गावातील चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी चार आरोपींपैकी दोन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यातील एकाला संतप्त जमावाने चांगलाच चोप दिला होता. मात्र, संध्याकाळपर्यंत पोलिसांकडून कोणतीही तक्रार नोंदवली गेली नव्हती. पोलिसांनी फक्त आत्महत्येचे कारण नोंदवले गेले. हे लक्षात येताच पीडितेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रात्री 11 वाजेपर्यंत मृतदेहासह पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
राजकीय हस्तक्षेपाचा संशय
आधी भाजपच्या नेत्यांनी सुहास बाबर यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. नंतर शिंदे गटाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप केला. पोलीस तपासात दिरंगाई झाली, गुन्हा उशिरा दाखल झाला, त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






















