Sangli News : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तेचा पेच; तासगावमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा, भाजपचा धुव्वा
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. 18 पैकी नऊ-नऊ अशा समान जागा दोन्ही आघाड्यांना मिळाल्या आहेत. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा धुवा उडाला आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. या ठिकाणी 18 पैकी नऊ-नऊ अशा समान जागा परस्परविरोधी दोन्ही आघाड्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे काठावरचे बहुमत मिळाल्याने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. भाजप-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आघाडीमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली. दुसरीकडे, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा धुवा उडाला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली सत्ता पुन्हा एकदा राखली आहे.
आटपाडीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही
त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट झाला आहे. बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. 93 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. भाजप राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट, काँग्रेस आघाडी या ठिकाणी मैदानात होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हणमंतराव देशमुख यांची तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची प्रतिष्ठा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. त्यामुळे चुरशीची लढत या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. त्यामध्ये 18 पैकी 9 -9 अशा जागा दोन्ही आघाड्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू न शकल्याने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी सत्ता कोणाची? याचा पेच निर्माण झाला आहे.
सभापती निवडणुकीत तिढा सुटण्याची चिन्हे
हा तिढा आता सभापती निवडणुकीमध्येच सुटू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून या ठिकाणी भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाची सत्ता कायम राहिली आहे. यंदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हणमंतराव देशमुख यांनी एकत्रित येत आघाडी केली होती. या आघाडीला शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी आव्हान दिले होते.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा धुव्वा
दरम्यान, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली सत्ता पुन्हा एकदा राखली आहे. 18 पैकी तब्बल 14 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजय झाले. भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांनी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा गड कायम राखला. भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या गटाला केवळ 4 जागा मिळाल्या. अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची ही निवडणूक झाली.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर काँग्रेसचा एक गट शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी होती. या आघाडी विरोधात भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचा एक गट अशी आघाडी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या :